जनावरे खरेदी-विक्री निर्बंधास सर्वोच्च न्यायालयात आव्हान

पीटीआय
गुरुवार, 8 जून 2017

केंद्र सरकारने जनावरांच्या खरेदी-विक्रीवर घातलेल्या निर्बंधांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, यावर 15 जूनला सुनावणी होणार आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने जनावरांच्या खरेदी-विक्रीवर घातलेल्या निर्बंधांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, यावर 15 जूनला सुनावणी होणार आहे.

सुटीकालीन खंडपीठाचे न्यायाधीश अशोक भूषण आणि दीपक गुप्ता यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी होईल. हैदराबादस्थित मोहंमद अब्दुल फहीम कुरेशी यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यांनी याचिकेत म्हटले आहे, की सरकारने जनावरांची कत्तलीसाठी खरेदी व विक्री करण्यावर निर्बंध आणणारे नवे नियम लागू केले आहेत. हे नियम घटनाबाह्य असून, यामुळे नागरिकांचे धार्मिक व नैतिक स्वातंत्र्य आणि जगण्याच्या हक्कावर गदा येत आहेत. प्राणी बळी देण्याच्या धार्मिक प्रथा पार पाडण्याच्या स्वातंत्र्याच्या विरोधात हा नियम आहे. जनावरांच्या कत्तलीवर बंदी घातल्याने नागरिकांचा अन्नाचा हक्क डावलण्यात येत आहे. केरळ, पश्‍चिम बंगाल, त्रिपुरा आणि कर्नाटक राज्यांनी केंद्र सरकारच्या नियमांची अंमलबजावणी करण्यास नकार दिला आहे. नागरिकांचे जीवित अवलंबून असलेल्या व्यवसायावर यामुळे गदा येईल, असे कारण या राज्यांनी दिले आहे, असे याचिकेत नमूद केले आहे.

Web Title: india news national news supreme court aniaml issue