काश्‍मीर प्रश्नावर भारत-पाकिस्तानने चर्चेतून तोडगा काढावा: संयुक्त राष्ट्रसंघ

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 जुलै 2017

उभय देशांनी हा प्रश्न शांततेच्या मार्गाने हाताळण्याची गरज ही गुटेरेस यांनी व्यक्त केल्याची माहिती त्यांच्या प्रवक्‍त्याने दिली आहे

न्यूयॉर्क - काश्‍मीर समस्येवर भारत-पाकिस्तानने चर्चा करून तोडगा काढावा, असा पुनरुच्चार संयुक्त राष्ट्रसंघाचे (यूएन) सरचिटणीस ऍन्टोनियो गुटेरेस यांनी आज (शुक्रवार) केला. उभय देशांनी हा प्रश्न शांततेच्या मार्गाने हाताळण्याची गरज ही गुटेरेस यांनी व्यक्त केल्याची माहिती त्यांच्या प्रवक्‍त्याने दिली आहे.

काश्‍मीर समस्येकडे सरचिटणीसांचे पुरेसे लक्ष आहे का, की आपण त्यांचे लक्ष या मुद्द्याकडे वेधण्यासाठी कोणती मोठी घटना घडण्याची वाट पाहत आहोत, या प्रश्नावर बोलताना गुटेरेस यांचे प्रवक्ते स्टिफन म्हणाले, "आम्ही दोन्ही देशांना ही समस्या चर्चेतून सोडविण्याचे आवाहन केले आहे, आणि सरचिटणीसांनी स्वतः पत्रकार परिषदेत याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती.'

गुटेरेस यांनी जूनमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत "काश्‍मीर वाद सोडविण्यासाठी तुम्ही दोन देशांत संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहात का,' अशी विचारणा त्यांना करण्यात आली होती. त्यावर गुटेरेस यांनी आपण या अनुषंगाने पाकिस्तानच्या पंतप्रधान नवाज शरीफ यांची तीनदा तसेच, भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दोनदा भेट घेतल्याचे स्पष्ट केले होते, असेही स्टिफन यांनी निदर्शनास आणून दिले.

Web Title: India, Pakistan should resolve Kashmir issue through talks: UN chief