संसदेचे अधिवेशन 7 दिवस आधीच गुंडाळले; विरोधी पक्षांच्या बहिष्कारांचे गालबोट

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 23 September 2020

 कडेकोट सुरक्षाव्यवस्था आणि आरोग्य विषयक नियमावलीचे पालन होऊनही आतापर्यंतच्या सर्व अधिवेशनांच्या तुलनेत यंदाच्या पावसाळी अधिवेशनाची उत्पादकता १६७ टक्के राहिली. 

नवी दिल्ली - कोरोना संकटामुळे कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत झालेले संसदेचे ऐतिहासिक पावसाळी अधिवेशन ठरलेल्या मुदतीआधीच म्हणजे तब्बल सात दिवस आधीच गुंडाळण्यात आले. कृषी सुधारणा विधेयकांवरून राज्यसभेत झालेला गोंधळ आणि खासदारांचे निलंबन या पार्श्वभूमीवर सर्व विरोधी पक्षांच्या बहिष्काराचे गालबोट या अधिवेशनाला लागले.

संसदेचे अधिवेशन १४ सप्टेंबरला सुरू झाले होते आणि वेळापत्रकानुसार १ ऑक्टोबरपर्यंत चालणार होते. मात्र देशभरात थैमान घालणाऱ्या कोरोना संकटाची झळ संसद भवनापर्यंत पोहोचल्याने सर्व पक्षांनी सरकारकडे मागणी केली होती की अधिवेशन घेण्याचे घटनात्मक बंधन पूर्ण झाले असल्याने आता अधिवेशन समाप्त करावे. त्यापार्श्वभूमीवर आज अधिवेशनाची सांगता झाली. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी पावसाळी अधिवेशन ऐतिहासिक असल्याचे समारोप प्रसंगी सांगितले. कडेकोट सुरक्षाव्यवस्था आणि आरोग्य विषयक नियमावलीचे पालन होऊनही आतापर्यंतच्या सर्व अधिवेशनांच्या तुलनेत यंदाच्या पावसाळी अधिवेशनाची उत्पादकता १६७ टक्के राहिली.

शनिवार आणि रविवार सुटी न घेता सलग दहा दिवस झालेल्या लोकसभेच्या बैठकांसाठी कामकाजाची वेळ ३७ तास ठरविण्यात आली होती. प्रत्यक्षात साठ तास कामकाज झाले असल्याने तब्बल २३ तास अतिरिक्त काम झाले. यात कृषी क्षेत्रातील सुधारणांशी संबंधित विधेयके, जीवनावश्यक वस्तु कायदा दुरुस्ती विधेयक, श्रम संहिता विधेयकांसह २५ विधेयके संमत करण्यात आली.

हे वाचा - भारत बायोटेक बनविणार एक अब्ज डोस; वॉशिंग्टन विद्यापीठाशी करार

वर्तमान परिस्थितीमुळे संसद परिसरात संक्रमणामुळे सुरक्षेचे व्यापक व्यवस्था करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर, खासदारांनी लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांमध्ये आणि दिर्घिकांमध्ये बसून कामकाजात सहभागी होणे हे संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच झाले, अशी टिप्पणीही लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली. तसेच, नियम ३७७ द्वारे मांडल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या विषयांना मंत्रालयांनी तत्काळ उत्तर द्यावे यासाठी झालेल्या प्रयत्नांमुळे १७ व्या लोकसभेत ९८.३४ टक्के विषयांवर मंत्रालयांकडून महिनाभरात उत्तरे मिळाल्याचेही अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले.

लोकसभेत असे झाले कामकाज
- २५ विधेयके संमत
- २३०० अतारांकित प्रश्न मांडले
- शून्यकाळात ३७० विषय उपस्थित
- शून्यकाळात ८८ तर अधिवेशनात २३० खासदारांना बोलण्याची संधी
-नियम ३७७ अंतर्गत १८१ विषय उपस्थित
-कोरोना, चीन सीमावादावर सरकारकडून सविस्तर निवेदन सादर
-कोरोनावर नियम १९३ अन्वये अल्पकालीन चर्चा

हे वाचा - मोदींसोबत शाहीनबागच्या 'दादी'देखील आहेत 'टाइम'च्या प्रभावशाली व्यक्तीच्या यादीत

तत्पूर्वी, संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी संसदेतील आरोग्यविषयक सुरक्षा व्यवस्थेसाठी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्या प्रयत्नांची स्तुती करताना आभार मानले. सदन काळात आवारात ३ ते चार हजार लोक असतात. पण पिठासीन अधिकाऱ्यांच्या सजगतेमुळे आणि देवाच्या आशीर्वादाने सारे सुरक्षित राहिले, याबद्दल सर्व सदनाकडून आणि आणि अनुपस्थित विरोधकांकडूनही त्यांचे आभार मानतो, असे संसदीय कार्यमंत्री म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india parliament Monsoon session cut short 7 days