'यूएई'च्या पॅराट्रूपर्सच्या पथकाला भारताचा नकार

वृत्तसंस्था
बुधवार, 11 जानेवारी 2017

नवी दिल्ली : प्रजासत्ताकदिनी राजपथावरील संचलनात भाग घेण्यासाठी पॅराट्रूपर्सचे पथक पाठविण्याची तयारी संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) दर्शविली होती; मात्र सुरक्षेच्या कारणांवरून भारताने त्यास नकार दिला आहे.

मागील वर्षी प्रजासत्ताकदिनी राजपथावरील संचलनात फ्रान्सच्या लष्कराचे पथक सहभागी झाले होते. या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील मुख्य सोहळ्याला अबुधाबीचे युवराज शेख मोहंमद बिन झायेद हे प्रमुख अतिथी असणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर यूएईच्या लष्कराच्या पथकाला संचलनात सहभागी होण्यासाठी भारताकडून आमंत्रण देण्यात आले होते. मात्र, लष्करी जवानांचे पथक पाठविण्याऐवजी पॅराशूटच्या साह्याने हवेत कसरती सादर करणाऱ्या पॅराट्रूपर्सचे पथक पाठविण्याची तयारी यूएईकडून दर्शविण्यात आली होती. मात्र, राष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर अतिमहत्त्वाच्या व्यक्ती संचलनाच्या वेळी राजपथावर उपस्थित असतात. त्यामुळे सुरक्षेचे कारण देत यूएईच्या पॅराट्रूपर्सच्या पथकाला नकार देण्यात आला असल्याचे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले. अबुधाबीचे युवराज हेच यूएईच्या लष्कराचे उपप्रमुख आहेत.

Web Title: india refuses uae paratroopers team