रशियाच्या लशीला कोपरा; मोठ्या प्रमाणावरील चाचणीस भारताचा नकार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 October 2020

सर्वांत आधी रशियाने जागतिक पातळीवर लसनिर्मिती केल्याचा दावा केला होता. त्यांच्या लशीची चाचणी अद्याप सुरु असली तरीही इतक्या गडबडीत लसनिर्मिती करणं हे धोक्याचं असल्याचं संशोधकांकडून बोललं गेलं आहे.

नवी दिल्ली : गेल्या आठ महिन्यांपासून कोरोना हा भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात थैमान घालत आहे. कोरोना विषाणूने जगातील मानवजातील अक्षरश: वेठीला धरले आहे. या विषाणूसोबत लढण्यासाठी कधी एकदा लस येतेय, अशी अवस्था सर्वांची झाली आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातील संशोधक लशीच्या निर्मितीवर काम करत आहेत. जगभरात वेगवेगळ्या देशांत वेगवेगळ्या टप्प्यावर या लशींची चाचणी सुरु आहे. अद्याप कोणत्याही लशीला जागतिक मान्यता मात्र मिळाली नाहीये. सर्वांत आधी रशियाने जागतिक पातळीवर लसनिर्मिती केल्याचा दावा केला होता. त्यांच्या लशीची चाचणी अद्याप सुरु असली तरीही इतक्या गडबडीत लसनिर्मिती करणं हे धोक्याचं असल्याचं संशोधकांकडून बोललं गेलं आहे. रशिया हा भारताचा जुना मित्र असला  तरीही त्यांच्या स्फुटनिक-5 लशीच्या चाचणीसाठी भारताने नकार दिला आहे. 

ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने भारतात रशियाने बनवलेल्या स्फुटनिक -5 या कोरोना लशीचे मोठ्या प्रमाणावर क्लिनीकल ट्रायल करण्याच्या प्रस्तावाला नकार दिला आहे. भारतीय फार्मा कंपनी डॉ. रेड्डी यांनी भारतात स्फुटनिक-5 या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी मागितली होती. डीसीजीआयने डॉ. रेड्डीज यांना आधी कमी प्रमाणात लशीची चाचणी करण्यास सांगितले आहे. रशियाने सर्वात आधी परिणामकारक अशा कोरोनाच्या लशीचा दावा केला होता. भारतीय कंपनी डॉ. रेड्डीजने लशीच्या क्लिनीकल ट्रायलसोबतच त्याच्या वितरणासाठी करार केला आहे. रशियन सरकारने सप्टेंबरच्या सुरवातीलाच स्पुटनिक-5 या आपल्या लशीची पहिली खेप सामान्य लोकांसाठी उपलब्ध केली होती. 

हेही वाचा - राजकारणातील 'हवामान तज्ज्ञ'; बिहारच्या निवडणुकीचे वातावरण तर सांगून गेले नाहीत ना?

केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या एका विशेतज्ञांच्या पॅनेलने आपल्या शिफारशीत म्हटलंय की सुरवातीच्या ट्रायलमध्ये या लशीच्या सुरक्षिततेविषयी आणि परिणामकारकतेविषयी खूप कमी माहिती मिळाली आहे आणि भारतीय नागरिकांवर झालेल्या ट्रायलचे निष्कर्षदेखील उपलब्ध नाहीयेत. जागतिक स्तरावर रशियाच्या लशीच्या सुरक्षेबाबत शंका व्यक्त केली गेलीय कारण अगदी कमी वेळात या लशीची निर्मिती करुन ती जाहिर करण्यात आली होती. भारताची ही भुमिका रशियाला धक्कादायक वाटू शकते. मात्र, सध्या भारतात तीन लशींवर ट्रायल सुरु आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत लसनिर्मिती सुरु केली आहे. तसेच भारत बायोटेकने आयसीएमआरसोबत लशीची चाचणी सुरु केली आहे आणि जॉयडस या लशीचीही मानवी चाचणी सुरु आहे. 

हेही वाचा - आला हिवाळा, आरोग्य सांभाळा; थंडीत कोरोना बदलू शकतो रुप

आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी बुधवारी म्हटलं की, कोरोनावरील लशीसंदर्भात माझा संशोधकांवर विश्वास आहे आणि कोरोनाच्या लढाईमध्ये लवकरच भारत यश प्राप्त करेल. त्यांच्या म्हणण्यानुसार पुढील वर्षाच्या जुलैपर्यंत देशात कोरोना लशीचे 40 ते 5 कोटी डोस तयार होती. तसेच 20 ते 25 कोटी लोकांना ती दिलीही जाईल. या लशीकरणासाठी राज्य सरकारांकडून या ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत प्राथमिक यादी घेण्यासाठीचे स्वरुप ठरवले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india rejects to test russian vaccine sputnik v in large study