Indian Air Strike : भारताने पाकचे एक विमान पाडले; पण आपला वैमानिक... 

Abhinandan
Abhinandan

नवी दिल्ली : 'दहशतवादाविरोधात भारताने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईनंतर पाकिस्तानने आज (बुधवार) भारताच्या लष्करी ठाण्यांना लक्ष्य करत बॉम्बहल्ला करण्याचा प्रयत्न केला; पण सुरक्षा यंत्रणा कमालीच्या दक्ष असल्याने हा हल्ला निष्फळ ठरला', असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. या कारवाईमध्ये भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचे एक विमान पाडले; पण याच कारवाईत आपलेही एक विमान पडले आणि त्यातील वैमानिक अद्याप बेपत्ता आहे, असेही परराष्ट्र मंत्रालयाने मान्य केले. 

'जैश ए महंमद' या दहशतवादी संघटनेचा तळ भारतीय हवाई दलाने काल (मंगळवार) पहाटे उध्वस्त केला. पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या या कारवाईमुळे त्या देशाचे लष्कर संतापले आहे. भारताचा हवाई हल्ला म्हणजे पाकिस्तानच्या संरक्षण सज्जतेची लक्तरेच उघड करणारा होता. त्यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने आज सकाळी भारतीय हद्दीत विमाने घुसवून हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न केला. 

यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत भारताची भूमिका स्पष्ट केली. 'पाकिस्तानची विमाने आपल्या हद्दीत घुसली होती; पण सुरक्षा यंत्रणा कमालीच्या दक्ष होत्या. त्यामुळे हा हल्ला निष्फळ ठरला. भारताच्या 'मिग 21' विमानाने पाकिस्तानचे एक विमान पाडले. हे विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळताना दिसले आहे. पण याच कारवाईदरम्यान भारताचे एक 'मिग 21' विमान कोसळले. त्यातील वैमानिक बेपत्ता आहे. हा वैमानिक त्यांच्या ताब्यात असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. यासंदर्भातील अधिक तपशील तपासून पाहिले जात आहेत', असे रवीश कुमार यांनी सांगितले.

भारताच्या वैमानिकाला ताब्यात घेतल्याची माहिती पाकिस्तानने अद्याप अधिकृतरित्या कळविलेली नाही. त्यामुळे त्याच्या सुटकेसंदर्भात भारत राजनैतिक मार्ग वापरणार की संयुक्त राष्ट्रांकडे दाद मागणार, यासंदर्भात चाचपणी सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com