धार्मिक सलोखा भारताने जगाला दाखवावा : दलाई लामा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

अनेक धर्म एकाच राष्ट्रात असूनही भारतासारखे मोठे राष्ट्र गुण्यागोविंदाने नांदू शकते, हे दाखविण्याची वेळ आता आली' असल्याचे मत तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांनी व्यक्‍त केले. 

पणजी : 'भारताला पूर्वापार काळापासून धार्मिक सलोख्याची देणगी मिळाली आहे. जगभरातील धर्मांमध्ये असणाऱ्या वादांना मिटविण्यासाठी हा धार्मिक सलोखा भारताने जगाला दाखवावा. अनेक धर्म एकाच राष्ट्रात असूनही भारतासारखे मोठे राष्ट्र गुण्यागोविंदाने नांदू शकते, हे दाखविण्याची वेळ आता आली' असल्याचे मत तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांनी व्यक्‍त केले. 

गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या साखळी येथील संस्थेच्या वर्धापनदिनी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. भारतात असणाऱ्या सध्याच्या शिक्षणपध्दतीची ओळख ब्रिटिशांनी करून दिली. मात्र आपण आपल्या पूर्वजांनी रचलेली शिक्षणपद्धती या ओघात विसरलो. जगभरात असणाऱ्या ताणतणावाचे मूळ हे शिक्षणपद्धतीतही दडले आहे. मनाशी शांतता आवश्‍यक असण्याची गरज जर मुलांना सांगितली तर अनेक प्रश्‍न सुटणे शक्‍य आहे. पुरातन भारतात असणाऱ्या शिक्षणपध्दतीची मुळे शोधून काढून पुन्हा भारतीयांसह जगाला या शिक्षणपध्दतीची पुनःओळख करून द्यायला हवी. भारतीयांकडे असणाऱ्या या शिक्षणपध्दतीचे कौतुक आजपर्यंत अनेक मोठ्या शास्त्रज्ञांनी केलेले असून आपल्याच शिक्षणपध्दतीचा विसर आपल्याला पडता कामा नये, असेही दलाई लामा म्हणाले. 

'मी वयाच्या 16 व्या वर्षी स्वातंत्र्य आणि चोविसाव्या वर्षी माझा देश गमावला. चीन आणि तिबेटमध्ये असणाऱ्या संघर्षामध्ये भरडले जाताना आम्ही सत्याची कास कधीच सोडली नाही. मार्च 1959 मध्ये देश सोडतानाही असे अनेक प्रसंग आयुष्यात आले, ज्यातून आमच्या अस्तित्वावरही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. चीनच्या हातात बंदुकांची ताकद होती, आमच्यात सत्याची कास होती. आजही तिबेटियन लोक चीनला आपला शत्रू मानत नाहीत तर आम्ही त्यांना आमच्या कुटुंबीयांचा दर्जा देत असल्याचे'ही दलाई लामा म्हणाले. 

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: India should show religious reconciliation to the world says Dalai Lama