'इंटरसेप्टर'ची चाचणी यशस्वी

वृत्तसंस्था
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

इंटरसेप्टरने रडार आणि दिशादर्शन यंत्रणेचा वापर केला. दरम्यान, या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "डीआरडीओ'च्या शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.

बालासोर (ओडिशा) - भारताने आज ओडिशाच्या किनाऱ्यावरून क्षेपणास्त्रभेदी (इंटरसेप्टर) क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली.

या चाचणीच्या यशामुळे भारताने द्विस्तरीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली विकसित करण्याच्या दिशेने पुढील पाऊल टाकले आहे. आज सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी येथील अब्दुल कलाम बेटावरून (व्हीलर बेट) इंटरसेप्टरची चाचणी घेतली गेली. जमिनीपासून हवेत पन्नास किमीच्या वरील उंचीवर असणाऱ्या लक्ष्याचा भेद करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता असल्याचे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) अधिकाऱ्यांनी सांगितले. आज झालेल्या चाचणीदरम्यान इंटरसेप्टरने बंगालच्या उपसागरात दोन हजार किमी अंतरावरून सोडलेल्या चाचणी लक्ष्याचा अचूक भेद केला.

यासाठी इंटरसेप्टरने रडार आणि दिशादर्शन यंत्रणेचा वापर केला. दरम्यान, या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "डीआरडीओ'च्या शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.

Web Title: India Successfully Test-Fires Star Wars-Type Interceptor Missile