भारताच्या उच्चायुक्तांना रोखले यात्रेकरूंना भेटण्यास पाकची मनाई; भारताकडून तीव्र निषेध 

पीटीआय
रविवार, 24 जून 2018

भारताचे पाकिस्तानमधील उच्चायुक्तांना पाकिस्तान सरकारने रावळपिंडीजवळील गुरुद्वाराला भेट देण्यास आज मनाई केली. त्यांच्या या कृतीवर भारत सरकारने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

इस्लामाबाद : भारताचे पाकिस्तानमधील उच्चायुक्तांना पाकिस्तान सरकारने रावळपिंडीजवळील गुरुद्वाराला भेट देण्यास आज मनाई केली. त्यांच्या या कृतीवर भारत सरकारने तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया हे त्यांच्या पत्नीसह रावळपिंडीनजीक हसन अब्दल येथे असलेल्या पंजा साहिब गुरुद्वारा येथे जात असताना त्यांना अडविण्यात आले. गुरुद्वारामध्ये असलेल्या भारतीय यात्रेकरूंनाही ते भेटणार होते. मात्र, पाकिस्तान सरकारने मनाई करत त्यांना इस्लामाबादला परतणे भाग पाडले. बिसारिया यांनी रावळपिंडीला जाण्यापूर्वी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून रीतसर परवानगी घेतली असतानाही हा प्रकार घडला. भारतीय उच्चायुक्तांना गुरुद्वारात जाऊन भारतीय यात्रेकरूंना भेटण्यापासून पाकिस्तानने अडविण्याची ही सलग दुसरी वेळ आहे. 

भारत सरकारबरोबरच शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीनेही या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. भारतीय उच्चायुक्तांना भेटण्याची भारतीय यात्रेकरूंनी पाकिस्तानकडे विनंती केली असतानाही त्यांची भेट होऊ न देणे चुकीचे असल्याचे या समितीने म्हटले आहे. 

पाकच्या उच्चायुक्तांना समन्स 
नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये गेलेल्या भारतीय यात्रेकरूंना भेटण्यास भारताच्या उच्चायुक्तांना मनाई केल्याबद्दल भारताने पाकिस्तानच्या उपउच्चायुक्तांना पाचारण करत त्यांच्याकडे तीव्र निषेध व्यक्त केला. भारतीय उच्चायुक्तांना त्यांचे कर्तव्य करण्यात अडथळा आणणे हा राजनैतिक संबंधांबाबतच्या व्हिएन्ना कराराचा भंग असल्याचे भारताने पाकिस्तानच्या निदर्शनास आणून दिले. 

1961 च्या व्हिएन्ना करारानुसार आणि 1974 च्या धार्मिक स्थळांना भेटीबाबतच्या शिष्टाचार करारानुसार एकमेकांच्या देशांत गेलेल्या यात्रेकरूंना भेटण्यास उच्चायुक्तांना परवानगी असते. या यात्रेकरूंना सर्व बाबींची माहिती करून देणे उच्चायुक्तांचे कर्तव्य असते. हे कर्तव्य बजावण्यात अडथळा आणल्याबद्दल भारत सरकारने पाकिस्तानचे भारतामधील उपउच्चायुक्त सय्यद हैदर शहा यांना पाचारण केले आणि त्यांच्याकडे निषेध व्यक्त केला. भारतातील फुटीरतावादी चळवळीला पाकिस्तानमधून पाठबळ मिळत असल्याबद्दल आणि भारतीय यात्रेकरूंना चिथावणी दिली जात असल्याबद्दल भारताने नाराजी व्यक्त केली, असे परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले

पाकिस्तानमधील भारताच्या उच्चायुक्तालयानेही पाकिस्तान सरकारकडे आजच्या घटनेबद्दल निषेध नोंदविला. 

Web Title: India summons Pakistan deputy high commissioner over denial to envoy to meet pilgrims