देशाला पर्यटनातून मिळाले दोन अब्ज डॉलर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

गुजरात सरकारने राज्यामध्ये पर्यटनस्थळांवर प्रदर्शनांचे आयोजन केले आहे. उत्तराखंड सरकारतर्फे देव दिवाळीचे आयोजन केले जाते. उत्तर प्रदेश सरकारने दीपावली पर्वाला महत्त्व दिले आहे. केरळ सरकारतर्फे वायनाड जिल्ह्यात निबंध, चित्रकला स्पर्धा घेण्यात येत आहे. याशिवाय बिहारच्या पश्‍चिम चंपारण्य जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रम होत आहे. ही सारी परिस्थिती पाहता दीपोत्सवातील पर्यटन मिळकतीचा आलेख उंचावत जाणार, हे स्पष्ट झाले आहे

नवी दिल्ली - पर्यटनाच्या माध्यमातून देशाला गेल्या महिन्यात 13 हजार 867 कोटी रुपयांची (2.153 अब्ज अमेरिकी डॉलर) परकी मिळकत झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 10 हजार 415 कोटी रुपयांची मिळकत झाली होती. आताच्या दीपोत्सवानिमित्त देशभर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महोत्सवांची धूम सुरू आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये उत्सवांचे महत्त्व निरनिराळे आहे. शेतीतील नवीन उत्पादनांचा आनंद घेतला जात असतानाच तीर्थटनाचेही विशेष आकर्षण देशवासीयांमध्ये आहे. अशा या उत्सवी वातावरणात पर्यटनाचा आलेख उंचावत जातो. परदेशी पर्यटकांनाही हे उत्सवी वातावरण भुरळ घालते. त्यामुळे दीपोत्सवाच्या काळात परदेशी पर्यटकांची संख्या वाढते, असा आजवरचा अनुभव आहे. पर्यटन पर्वानिमित्त पंजाब सरकारतर्फे दिल्लीच्या भारतीय पर्यटनच्या सहकार्याने अमृतसरमध्ये सायकल रॅली झाली.

गुजरात सरकारने राज्यामध्ये पर्यटनस्थळांवर प्रदर्शनांचे आयोजन केले आहे. उत्तराखंड सरकारतर्फे देव दिवाळीचे आयोजन केले जाते. उत्तर प्रदेश सरकारने दीपावली पर्वाला महत्त्व दिले आहे. केरळ सरकारतर्फे वायनाड जिल्ह्यात निबंध, चित्रकला स्पर्धा घेण्यात येत आहे. याशिवाय बिहारच्या पश्‍चिम चंपारण्य जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रम होत आहे. ही सारी परिस्थिती पाहता दीपोत्सवातील पर्यटन मिळकतीचा आलेख उंचावत जाणार, हे स्पष्ट झाले आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पर्यटनातील मिळकत 19.1 टक्‍क्‍यांनी अधिक आहे. डॉलरमध्ये ही मिळकत 23.5 टक्‍क्‍यांनी अधिक आहे. जानेवारी ते सप्टेंबर 2017 या कालावधीत पर्यटनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या मिळकतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 16.8 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे.

Web Title: india tourism diwali festival