‘नागरिकत्व’चे भारत पाहून घेईल! - डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्ली - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या राजघाट या समाधिस्थळी मंगळवारी आदरांजली अर्पण करताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. सोबत पत्नी मेलानिया.
नवी दिल्ली - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या राजघाट या समाधिस्थळी मंगळवारी आदरांजली अर्पण करताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. सोबत पत्नी मेलानिया.

नवी दिल्ली - ‘नागरिकत्व कायदा हा भारताचा निर्णय असून, स्वतःसाठी योग्य निर्णय करण्याची भारताची क्षमता आहे,’’ अशा शब्दांत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातील संवेदनशील कायद्यावर भाष्य करण्याचे टाळले. पंतप्रधान नरेंद्र मोदी धार्मिक स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते असल्याचे प्रशस्तिपत्रही त्यांनी बहाल केले. तसेच, काश्‍मीरच्या मुद्द्यावर भारत आणि पाकिस्तानची सहमती असेल तरच मध्यस्थी करू, असाही सावध पवित्रा ट्रम्प यांनी घेतला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. ट्रम्प यांच्या दोनदिवसीय भारत दौऱ्याची सांगता या पत्रकार परिषदेतून झाली. अमेरिकेच्या व्यापारी हिताला केंद्रस्थानी ठेवत ट्रम्प यांनी भारत दुखावणार नाही, याची खबरदारी घेतल्याचे दिसले.

कोरोना विषाणूच्या उपद्रवावर चीनच्या अध्यक्षांशी झालेले बोलणे, कट्टर इस्लामिक दहशतवाद, इंडो-पॅसिफिकसारख्या जागतिक मुद्द्यांची उजळणी करताना अमेरिकेतील राजकारण आणि निवडणुकीवरही ट्रम्प यांनी भाष्य केले. मात्र, भारताशी संबंधित वादग्रस्त मुद्द्यांवर बोलण्याचे टाळले. दिल्लीतील हिंसाचार तसेच नागरिकत्व कायद्यासारखे मुद्दे भारताचा अंतर्गत विषय असल्याचे सांगणाऱ्या ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींवर स्तुतिसुमने उधळून भारतातील धार्मिक स्वातंत्र्याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. 

संवेदनशील मुद्दा बनलेल्या नागरिकत्व कायद्यावर तसेच आणि दिल्लीतील प्रदर्शनावरील प्रश्‍नाच्या उत्तरात ट्रम्प यांनी सावध टिप्पणी केली. दिल्लीत झालेल्या हिंसाचाराबद्दल आपण ऐकले असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. अर्थात, धार्मिक स्वातंत्र्याबाबत मात्र मोदींशी आपले अवश्‍य बोलणे झाले असून ते (मोदी) धार्मिक स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते आहेत, असे ट्रम्प यांनी नमूद केले.

पंतप्रधान मोदींनी मोठ्या जनसमूहासमोर आपल्याला लोकांच्या धार्मिक स्वातंत्र्यासाठी कटिबद्धतेची ग्वाही दिली आहे. त्यासाठी मोदींनी परिश्रमही घेतले आहेत, असेही ट्रम्प म्हणाले. नागरिकत्व कायद्यावर आपण काहीही बोलणार नसून हा भारताचा निर्णय आहे. आपल्याला खात्री आहे, की भारत स्वतःसाठी योग्य निर्णय करू शकतो आणि योग्य निर्णयच घेतला जाईल, असे ट्रम्प म्हणाले. 

पंतप्रधान मोदी अत्यंत धार्मिक आहेत. मोदी स्वभावाने शांत असले तरी दहशतवादाविरुद्धच्या लढाईसाठी ते अत्यंत कठोर आहेत, असे उद्‍गार ट्रम्प यांनी यावेळी काढले. मोदींच्या नेतृत्वाखाली भारताचे भविष्य उज्ज्वल असल्याची स्तुतिसुमने देखील त्यांनी उधळली. अमेरिका आणि भारताच्या वाढत्या मैत्रीमागे आपले आणि मोदींचे व्यक्तिगत मैत्रीसंबंध कारणीभूत असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. या मैत्रीमुळेच यामुळेच भारत आणि अमेरिकेचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक दृढ झाल्याचे ते म्हणाले. 

काश्‍मीरबद्दलही ट्रम्प यांनी सावध टिप्पणी केली. मध्यस्थीबाबतच्या प्रश्‍नाला उत्तर देताना ट्रम्प यांनी, (मध्यस्थतेबाबत) काही करणे शक्‍य असेल आपण नक्की करू. परंतु, दोन्ही देशांशी इच्छा असेल तरच यासाठी पुढाकार घेतला जाईल, अशीही पुस्ती जोडली. पाकिस्तानकडून दहशतवादाला प्रोत्साहन दिले जात असल्याबद्दल विचारले असता ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान दोन्हीही देश आपल्या समस्या सोडविण्यावर काम करत असून भारतीय पंतप्रधान मोदी आणि पाकिस्तानचे इम्रान खान या दोघांशी उत्तम संबंध आहेत, असा दावा केला.

ट्रम्प कुटुंबीयांना राष्ट्रपतींकडून मेजवानी
दिवसभरातील कार्यक्रम आटोपल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सायंकाळी त्यांच्या कुटुंबीयांसोबत राष्ट्रपती भवनात भोजनाचा आस्वाद घेतला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या पत्नी सविता यांच्याकडून ट्रम्प यांच्या सन्मानार्थ खास या मेजवानीचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे, विरोधी पक्षांनी मात्र या भोजन समारंभावर आधीच बहिष्कार टाकला होता. यामुळे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग या वेळी उपस्थित 
राहिले नाहीत.

संरक्षणसिद्धता...
भारताने अमेरिकेकडून एमएच-६० रोमिओ सीहॉक आणि अपाचे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार केला आहे. ही दोन्ही हेलिकॉप्टर अत्यंत अत्याधुनिक आणि घातक असून शत्रूच्या मनात धडकी भरविण्याबरोबरच आपत्कालीन परिस्थितीत बचावासाठीही उपयुक्त ठरणार आहेत. या दोन प्रकारच्या हेलिकॉप्टरच्या समावेशामुळे भारताची संरक्षण ताकद निश्‍चितच वाढणार आहे. 
एमएच-६० रोमिओ सीहॉक

निर्माती कंपनी : 
सिकोर्स्की (लॉकहिड मार्टिनची उपकंपनी)

वैशिष्ट्ये : 
कमाल वेग : २६७ किमी/तास
पल्ला : ८३४ किमी
उंची गाठण्याची क्षमता : ३,४३८ मीटर
वजन : ६,८९५ किलो
वजन वाहून नेण्याची क्षमता : 
१०,६५९ किलो 

भारताला काय उपयोग?
अँटी-सबमरीन आणि अँटी- सरफेस शस्त्रयंत्रणा असल्याने समुद्रात खोलवर असलेल्या पाणबुडीलाही लक्ष्य करण्याबरोबरच पाण्यावरील लक्ष्याचाही सहज भेद करण्याची क्षमता आहे. यामुळे नौदलाला संरक्षणासाठी उपयुक्त. यामध्ये अत्याधुनिक सेन्सर, टॉर्पेडो आणि क्षेपणास्त्रे असल्याने शत्रूच्या बोटी, पाणबुड्यांचा वेध घेणे शक्य.  

अपाचे एएच-६४ ई
भारत आणि अमेरिकेदरम्यान आधीच झालेल्या करारानुसार भारताला काही काळापूर्वीच आठ अपाचे हेलिकॉप्टर मिळाली आहेत. 
निर्माती कंपनी : बोईंग

वैशिष्ट्ये : 
कमाल वेग : २९० किमी/तास
एका मिनीटांत गाठली जाणारी उंची : 
८८९ मीटर
वजन : ६,८३८ किलो

भारताला काय उपयोग?
जगातील सर्वाधिक घातक, बहुउपयोगी हेलिकॉप्टर. अत्यंत आधुनिक क्षेपणास्त्रे डागण्याची क्षमता. आठ ते बारा किलोमीटर दूरवरील लक्ष्याचा भेद करण्यास उपयुक्त असल्याने भारतीय हवाई दलाला अटीतटीच्या मोहिमेत अत्यंत फायदेशीर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com