SurgicalStrike2 : भारताने घुसून मारले 

jet
jet

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या "मिराज' विमानांनी मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकिस्तानातील बालाकोट; तसेच व्याप्त काश्‍मीरमधील चाकोटी आणि मुझफ्फराबादमधील जैशे महंमद दहशतवादी संघटनेचे तळ उद्‌ध्वस्त केले. पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा बरोबर 11 दिवसांनी भारताने त्याचा सूड घेतला. अवघ्या दोन मिनिटांच्या कालावधीत झालेल्या कारवाईत साडेतीनशे दहशतवादी मारले गेले आहेत. जैशे महंमदचा म्होरक्‍या मसूद अजहरचा मेहुणा अजहर ऊर्व वस्ताद घोरी ऊर्फ मोहंमद सलीम आणि त्याचे दोन भाऊ इब्राहिम अजहर व

काश्‍मीर खोऱ्यात पुलवामा येथे जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारताने आज सूड घेत पाकिस्तानचे जुने हिशेब चुकते केले. हवाई दलाच्या बारा मिराज विमानांनी थेट पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात घुसून बालाकोट येथील "जैशे महंमद' या दहशतवादी संघटनेचा तळ नेस्तनाबूत केला. पाकव्याप्त काश्‍मीरमधील मुझफ्फराबाद आणि चाकोटी येथील दहशतवाद्यांच्या केंद्रांवरही या विमानांनी अक्षरश: अग्निवर्षाव केल्याने अवघे भूमंडळ थरारले. पहाटे 3.45 ला सुरू झालेली ही मोहीम 4 वाजून 05 मिनिटांनी संपली, प्रत्यक्षात केवळ दोन मिनिटांपेक्षाही कमी कालावधीत हजारो टन वजनांची स्फोटके दहशतवाद्यांच्या ठाण्यांवर डागण्यात आली. या कारवाईमध्ये "जैश'चे साडेतीनशेपेक्षाही अधिक दहशतवादी ठार झाले असून, मृतांमध्ये कुख्यात दहशतवादी मौलाना मसूद अझरचा मेहुणा आणि अन्य दोन भावांचाही समावेश आहे. 

"यह नया हिंदुस्थान है, ये घर में घुसेगा भी और मारेगा भी' हा "उरी : द सर्जिकल स्ट्राइक' या सिनेमातील डायलॉग आज प्रत्यक्षात आला, पाकिस्तानविरोधातील 1971 च्या युद्धानंतर आज प्रथमच भारतीय हवाई दल पुन्हा एकदा देशाच्या संरक्षणासाठी रणमैदानात उतरलेले पाहायला मिळाले. पुलवामातील हल्ल्यानंतर बालाकोटमध्ये दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांना हवाई दलाने मंगळवारचा सूर्यही बघू दिला नाही. पाकिस्तानमध्ये खोलवर घुसलेल्या मिराज विमानांनी केलेल्या बॉंब वर्षावात दहशतवाद्यांच्या ठाण्यांची राख रांगोळी झाली. भारताच्या कारवाईचे समर्थन करताना परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनीही गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारेच ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले. या वेळी त्यांनी हल्ल्याचा थेट उल्लेख टाळत या मोहिमेचा तपशील उघड करणे टाळले. खुद्द पंतप्रधान मोदी यांनीही राजस्थानातील चुरू येथील सभेत देश सध्या सुरक्षित हातांमध्ये असल्याचे सांगितले; पण भारताच्या कारवाईवर थेट भाष्य केले नाही. 

पाकिस्तान संभ्रमात 
हवाई दलाच्या "लेसर गाइड बॉंब'ने सुसज्ज असलेल्या "मिराज-2000' या बारा विमानांनी अबोटाबादला लागून असलेल्या बालाकोटलाच धडक दिली. या वेळी या विमानांना कव्हर देण्यासाठी सुखोई तीस विमानेही आकाशात घिरट्या घालत होती. यामध्ये हवेतच इंधन पुरवठा करणारी विमाने आणि "अवॅक्‍स' प्रणालीचाही समावेश होता. भारतीय विमानांनी डागलेल्या स्फोटकांचे वजन एक हजार किलोग्रॅमपेक्षाही अधिक होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. विविध हवाई तळांवरून भारतीय हवाई दलाच्या विमानांनी एकाच वेळी पाकिस्तानच्या दिशेने झेप घेतल्याने तेथील यंत्रणाही काहीकाळ बुचकळ्यात पडली होती. ही विमाने नेमकी कोठे जात आहेत, हेच शोधण्यात तेथील यंत्रणेचा वेळ गेला, त्याचवेळी अन्य विमानांनी तीन ठिकाणांवर बॉंब वर्षाव करत मोहीम फत्ते केली. 

हल्ल्यानंतर 
भेदरलेल्या पाकची प्रतिहल्ल्याची दर्पोक्ती 
इम्रान खान यांचे सुरक्षा दलांना तयारीचे आदेश 
पाकिस्तानी लष्कराकडून प्रथमच हल्ल्याची कबुली 
भारतात सर्वपक्षीय नेत्यांकडून कारवाईचे स्वागत 
हुतात्म्यांचे नातेवाईक कारवाईवर समाधानी 
परराष्ट्रमंत्री स्वराज यांची अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांशी चर्चा 
भारत पाकिस्तानने शांतता राखावी : युरोपियन महासंघ 
चीनसह आंतरराष्ट्रीय समुदायाची सावधगिरीची भूमिका 

अन्य विमानांची मदत 
हवाई दलाच्या बारा "मिराज-2000' या लढाऊ विमानांनी बालाकोटमध्ये आज केलेल्या हल्ल्यात अन्य विमानांचाही सहभाग होता, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. "सुखोई-30' या लढाऊ विमानांसह, हवेत इंधन भरून देणारे एक विमान आणि दोन "ऍवॅक्‍स' विमानांनी "मिराज-2000'ना आवश्‍यक ती मदत दिली. पाकिस्तानच्या प्रत्युत्तराची शक्‍यता गृहित धरून हवाई दलाच्या सर्व तळांना अतिदक्षतेचा आदेश देण्यात आला आहे. या कारवाईवर नवी दिल्लीतील हवाई दलाच्या मुख्यालयातून वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून होते. हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल बी. ए. धनोआ यांचा त्यात समावेश होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल, लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत आणि नौदलप्रमुख ऍडमिरल सुनील लांबा यांना सातत्याने या कारवाईची माहिती दिली जात होती. 

...आणि पाकची विमाने माघारी फिरली 
नियंत्रण रेषा ओलांडून (एलओसी) हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानात जाऊन केलेल्या कारवाईवेळी या विमानांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांकडून करण्यात आला. मात्र, भारतीय ताफ्यात मोठ्या संख्येने असलेली विमाने पाहून पाकिस्तानच्या विमानांना माघार घ्यावी लागली, अशी माहिती सूत्रांनी दिली. या कारवाईवेळी समन्वय साधण्याची जबाबदारी भारतीय हवाई दलाच्या पश्‍चिम विभागाकडून यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली. भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी तातडीने बैठक बोलावली होती. "पाकिस्तानवर सध्या धोक्‍याचे ढग निर्माण झाले असून, आम्ही दक्ष राहायला हवे,' अशी प्रतिक्रिया कुरेशी यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. 

"एलओसी'वर अतिदक्षतेचा इशारा 
हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानात जाऊन कारवाई केल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्‍मीरमधील पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवरील सुरक्षा दलांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. हवाई दलाने केलेल्या कारवाईपूर्वी पाकिस्तानकडून सीमेवर शस्त्रसंधीचा भंग करण्यात आला होता, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. 

पाकिस्तानचा ड्रोन पाडला 
गुजरातमध्ये कच्छच्या सीमेवर भारताने पाकिस्तानचा एक ड्रोन नष्ट केला. कच्छच्या सीमेवर आज सकाळी साडेसहाच्या सुमारास हा ड्रोन घिरट्या घालताना दिसला. त्यानंतर त्याला तातडीने नष्ट करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. 

इकडे दिवाळी, तिकडे शिमगा 
हवाई दलाच्या कारवाईचे वृत्त समजताच भारतीय नागरिकांमध्ये उत्साह संचारला. ठिकठिकाणी फटाके फोडले जात होते, तर अनेकांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला. अनेक ठिकाणी "भारत माता की जय'च्या घोषणा दुमदुमत होत्या. पाकिस्तानात मात्र विरोधकांनी "शर्म करो, शर्म करो' अशी नारेबाजी करत अपल्या सरकारचा निषेध केला. 

महिलांनी शिकविला धडा 
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन या आजच्या कारवाईच्या शिल्पकार असल्याचे मानले जात आहे. स्वराज यांनी कूटनीतीद्वारे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटे पाडले आणि सीतारामन यांनी आक्रमक भूमिका घेत हल्ला चढवला, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 

खूपच घाबरलो 
या हल्ल्याचा खैबर पख्तुनख्वा प्रांतातील प्रत्यक्ष साक्षीदार महंमद आदिलने सांगितले, की माझ्या घरापासून काही अंतरावरच हा हल्ला झाला. मी खूप घाबरलो होतो. आम्ही पाच ते दहा स्फोटांचे मोठ-मोठे आवाज ऐकले. आम्ही रात्रभर झोपू शकलो नाही. पाच ते दहा मिनिटांच्या अंतराने स्फोट होत होते. 

इस्लामाबाद होते सहा मिनिटांवर 
बालाकोट हे पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये आहे. तिथून इस्लामाबाद 196 किलोमीटरवर आहे. बालाकोटहून अबोटाबाद, तर फक्त 62 किलोमीटरवर आहे. बालाकोटहून लाहोर 448 किलोमीटरवर आहे. या हल्ल्यासाठी भारतीय हवाई दलाने "मिराज' या विमानांचा वापर केला होता. जवळपास अडीच हजार किलोमीटर प्रतितास इतक्‍या वेगाने जाणाऱ्या या विमानांना बालाकोटहून लाहोर किंवा इस्लामाबादला जाण्यासाठी काही मिनिटेही पुरली असती. एका अंदाजानुसार, "मिराज' विमानांनी अवघ्या सहा मिनिटांत इस्लामाबाद गाठले असते. त्यामुळे हवाई दलाने मारलेल्या या धडकेमुळे पाकिस्तानला नक्कीच मोठा धक्का बसला आहे. थेट राजधानीपर्यंत भारताची विमाने येऊ शकत असल्याचे उघड झाल्याने त्यांच्या संरक्षण यंत्रणेतील त्रुटीही उघड झाल्या आहेत. 

म्हणे, निवांत झोपा 
या हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील एक ट्विटर हॅंडल चांगलेच चर्चेत आले आहे. हे ट्विटर हॅंडल अधिकृत नसले तरी त्यांनी केलेले ट्विट सध्या चर्चेत आले आहे. भारताने केलेल्या हवाई हल्ल्याच्या तीन तास आधी पाकिस्तान डिफेन्स नावाच्या ट्विटर हॅंडलवरून "निवांत झोपा, कारण पाकिस्तानी हवाई दल जागे आहे', असे ट्विट करण्यात आले होते. या ट्विटर हॅंडलच्या विश्‍वासार्हतेबद्दल प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात असले, तरी या हॅंडलच्या "बायो'मध्ये डिफेन्स डॉट पीओके या संकेतस्थळाचा उल्लेख आहे. या ट्विटमध्ये पुढे पाकिस्तान जिंदाबाद हा हॅशटॅगही वापरण्यात आला. रात्री 12 वाजून 6 मिनिटांनी हे ट्विट करण्यात आल्यानंतर अवघ्या साडेतीन तासांत भारतीय हवाई दलाने हल्ला केला. त्यामुळे या ट्विटवरून पाकिस्तानी हवाई दलाला, तसेच पाकिस्तानलाही ट्रोल केले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com