पाकच्या 2 चौक्या उद्ध्वस्त; प्रत्युत्तरासाठी लष्कराला 'फ्री हँड'

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 मे 2017

पाकच्या भ्याड हल्ल्याच्या या क्रूर कृत्याला कसे प्रत्युत्तर द्यायचे याबद्दल जेटली आणि मोदी यांच्यात चर्चा होणार आहे. 

नवी दिल्ली : पाकिस्तानशी दोन हात करण्यासाठी भारतीय लष्कराला सांगण्यात आले असून, त्यांचे हात मोकळे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पाकच्या दोन चौक्या भारतीय फौजांनी उद्ध्वस्त केल्या आहेत. दरम्यान, संरक्षणमंत्री अरुण जेटली आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या घटनेची माहिती देणार आहेत.

जोरदार गोळीबार करून त्याचा फायदा घेत पाकिस्तानी सीमा कृती पथकाने भारतीय हद्दीत घुसखोरी करून दोन भारतीय जवानांचे शीर कापले, तर एकास गंभीर जखमी केले. जम्मू-काश्मीरच्या पूँच जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये सोमवारी पाकिस्तानने हा भ्याड हल्ला केला. 

पाकिस्तानी सैनिक ज्या ठिकाणाहून भारताच्या हद्दीत घुसले होते तेथील पाकच्या दोन चौक्या भारतीय फौजांनी उद्ध्वस्त केल्या आहेत. या हल्ल्यामध्ये गस्तीवरील 7 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचेही लष्करी सूत्रांनी सांगितल्याचे टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटले आहे. परंतु, या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पाकच्या भ्याड हल्ल्याच्या या क्रूर कृत्याला कसे प्रत्युत्तर द्यायचे याबद्दल जेटली आणि मोदी यांच्यात चर्चा होणार आहे. 
 

Web Title: indian army given free hand to respond to pakistan