एकापेक्षा जास्त आघाड्यांवर युद्ध करू शकतो: भारतीय लष्करप्रमुख

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

या मुलाखतीदरम्यान डोंगराळ भागांमध्ये लढण्यासाठी "17 स्ट्राईक कॉर्पस' या विशेष प्रशिक्षित तुकडीची निर्मिती करण्यात येत असल्याची माहिती दिली. लष्कराच्या आधुनिकीकरणावर भर देताना लष्करप्रमुखांनी यावेळी सरकारकडून यासंदर्भात देण्यात येणाऱ्या पाठिंब्याची प्रशंसा केली

नवी दिल्ली - भारतीय लष्कर हे देशांतर्गत व देशाबाहेरील आघाड्यांवर एकाच वेळी उद्‌भविणाऱ्या धोक्‍यांना तोंड देण्यासाठी समर्थ असल्याचे लष्करप्रमुख जनरल बीपिन रावत यांनी आज (गुरुवार) एका मुलाखतीदरम्यान सांगितले.

चीन, पाकिस्तान व देशांतर्गत परिस्थिती अशा "अडीच' आघाड्यांवर एकाच वेळी लढण्यास लष्कर सक्षम असल्याची भावना लष्करप्रमुखांनी यावेळी व्यक्त केली. मात्र याच वेळी, भारतीय लष्कराची तयारी कोणत्याही एका देशाविरोधात नसल्याचेही लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले. भारत हा विविध आघाड्यांवर लढाई करण्यास सक्षम असला; तरी युद्ध टाळण्यासाठी विविध उपाययोजनाही करणे आवश्‍यक असल्याचे मत जनरल रावत यांनी यावेळी व्यक्‍त केले. भारत-चीन सीमारेषेवर गेल्या 40 वर्षांत एकही गोळी झाडली गेली नसल्याचे पंतप्रधानांनीही सांगितल्याचे जनरल रावत यांनी नमूद केले.

या मुलाखतीदरम्यान डोंगराळ भागांमध्ये लढण्यासाठी "17 स्ट्राईक कॉर्पस' या विशेष प्रशिक्षित तुकडीची निर्मिती करण्यात येत असल्याची माहिती दिली. लष्कराच्या आधुनिकीकरणावर भर देताना लष्करप्रमुखांनी यावेळी सरकारकडून यासंदर्भात देण्यात येणाऱ्या पाठिंब्याची प्रशंसा केली. सरकारला लष्कराला कोणत्या बाबींची गरज आहे, याची जाणीव असून त्यांच्याकडून सर्वतोपरी पाठिंबा मिळत असल्याचे लष्करप्रमुखांनी सांगितले.

Web Title: Indian Army prepared for a multi front war: Army Chief