इशाऱ्यानंतरही जवानाचा तक्रारीचा व्हिडिओ

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 जानेवारी 2017

नवी दिल्ली : आपल्या गैरसोयींबद्दल सोशल मीडियाद्वारे तक्रारी न करण्याचा इशारा लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी देऊनही एका जवानाने याच माध्यमाचा आधार घेत सुटी मिळत नसल्याची तक्रार केली आहे. सीमेवरील अडचणींचा पाढाही त्याने वाचला असून, हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

नवी दिल्ली : आपल्या गैरसोयींबद्दल सोशल मीडियाद्वारे तक्रारी न करण्याचा इशारा लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी देऊनही एका जवानाने याच माध्यमाचा आधार घेत सुटी मिळत नसल्याची तक्रार केली आहे. सीमेवरील अडचणींचा पाढाही त्याने वाचला असून, हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

"द हिंदू'ने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित जवानाच्या या व्हिडिओमध्ये तो पंजाबी गाणी म्हणताना दिसतो. "दहा महिने झाले; पण एकही सुटी मिळालेली नाही, अश्रू आटून गेले आहेत,' असे तो म्हणतो. या जवानाबरोबर त्याचा एक साथीदारही दिसतो. गाण्याद्वारे या जवानाने सीमेवर तैनात असलेल्या जवानांच्या अडचणी मांडल्या आहेत. जेवणाच्या दर्जाबाबतही त्याने तक्रार केली असून, आम्हाला फक्त चपाती-लोणचे मिळते आणि शहरांतील लोक "ताज'(महाल)मध्ये (हॉटेल) जातात, असे तो म्हणतो. आपण विवाहित असल्याचेही विसरल्याची त्याची तक्रार आहे. हा व्हिडिओ फेसबुकवर टाकण्यात आला आहे. हा जवान कोठे तैनात आहे आणि त्याने कोठे व्हिडिओ तयार केला, याची माहिती मिळालेली नाही.

लष्करातील तरुणांची राजकारण्यांना काळजी नसल्याचा आक्षेपही या जवानाने नोंदविला आहे. ते फक्त "शुभ रात्री' म्हणून झोपून जातात आणि आम्ही सीमेवर दिवाळी साजरी करतो, अशी त्याची तक्रार आहे.

जवानांनी योग्य अधिकाऱ्यांकडे तक्रारी कराव्यात, थेट माझ्याकडेही तक्रार करता येईल; पण सोशल मीडियाचा वापर केल्यास, तो गुन्हा समजून संबंधिताविरुद्ध कारवाई केली जाईल, असा इशारा जनरल रावत यांनी नुकताच दिला आहे. तरीही हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सीमा सुरक्षा दलातील जवान तेजबहाद्दूर यादव याचा निकृष्ट दर्जाच्या जेवणाबाबत तक्रार करणाऱ्याचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे. या संदर्भात गृह मंत्रालयाने सीमा सुरक्षा दलाकडून अहवाल मागविला आहे.

Web Title: indian army soldier releases another video