भारतीय लष्कराने पाककडे उपस्थित केला हल्ल्याचा मुद्दा

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 मे 2017

अशा प्रकारचे भ्याड आणि अमानूष कृत्य हे औपचारिक संकेतांच्या पलीकडचे आहे. तसेच, ते निंदनीय असून, त्याचे प्रत्युत्तर द्यावे लागेल, असा संदेश लेफ्टनंट जनरल भट यांनी दिला. 

नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या वतीने लष्करी कारवायांचे महासंचालक लेफ्टनंट जनरल ए.के. भट यांनी आज (मंगळवार) पाकिस्तानच्या समपदस्थ अधिकाऱ्याशी हॉटलाईनवरून संपर्क साधला. पाकिस्तानी सीमा कृती पथकाने दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद केल्याचा मुद्दा त्यांनी यावेळी पाकिस्तानकडे उपस्थित केला. 

अशा प्रकारचे भ्याड आणि अमानूष कृत्य हे औपचारिक संकेतांच्या पलीकडचे आहे. तसेच, ते निंदनीय असून, त्याचे प्रत्युत्तर द्यावे लागेल, असा संदेश लेफ्टनंट जनरल भट यांनी दिला. 

शस्त्रसंधीचा भंग करून प्रत्यक्ष ताबारेषेवर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताचे दोन जवान हुतात्मा झाले. पाकिस्तानी लष्कराने भारतीय लष्कराच्या एका आणि सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाला प्रत्यक्ष ताबारेषेजवळ मारून त्यांचे शीर कापल्याची घटना काल (सोमवार) उघडकीस आली. पाकिस्तानने भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर भारताने ही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

या भ्याड कृत्याला सडेतोड उत्तर देण्याचा निर्धार भारतीय सैन्याने केला आहे. पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल कामर जावेद बाजवा यांनी नुकतीच प्रत्यक्ष ताबारेषेलगतच्या काही भागांना भेट दिली होती. त्यांनी काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना पाठिंबा दर्शवला होता. त्यांनंतर दुसऱ्या दिवशी हा भ्याड हल्ला करण्यात आला. 
 

Web Title: indian dgmo calls pakistani counterpart