लज्जास्पद...भारतीय पत्रकारांनी लंडनमध्ये चोरले चांदीचे चमचे...

वृत्तसंस्था
बुधवार, 10 जानेवारी 2018

एका पत्रकाराने मात्र त्याने काहीही चोरले नसल्याचाच दावा केला. या पत्रकाराने चोरलेले चांदीचे चमचे दुसऱ्या पत्रकाराच्याच बॅगमध्ये ठेवले होते. त्याचे हे कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे पुसटशी जाणीवही त्याला नव्हती. अखेर हॉटेल व्यवस्थापनाने या प्रकाराची पोलिस तक्रार करण्याचा इशारा दिल्यानंतर भयभीत झाल्यामुळे त्याने चोरी केल्याचे मान्य केले. या पत्रकारास 50 पौंड दंड भरल्यानंतर मुक्त करण्यात आले

लंडन - पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमवेत लंडन येथे गेलेल्या एका वरिष्ठ भारतीय पत्रकारास हॉटेलमधील चांदीचे चमचे (कटलरी) चोरल्याप्रकरणी 50 पौंड (सुमारे 4,300 रुपये) दंड करण्यात आल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे.

ममता यांच्यासमवेत असलेल्या इतर भारतीय पत्रकारांनीही या हॉटेलमधील औपचारिक भोजनावेळी हळूच टेबलवरील चांदीचे चमचे बॅगमध्ये ठेवले. मात्र त्यांचे लज्जास्पद कृत्य सीसीटीव्हीमध्ये दिसून आल्यानंतर तेथील सुरक्षा अधिकाऱ्यांकडून त्यांना समज देण्यात आली. यामुळे लज्जित झालेल्या या पत्रकारांनी चमचे पुन्हा टेबलवर ठेवले. हा भोजन समारंभ एका परदेशी शिष्टमंडळासमवेत होता. भारत व ब्रिटनमधील महत्त्वपूर्ण राजकीय नेते, उद्योगपती आणि पत्रकार यावेळी उपस्थित होते.

एका पत्रकाराने मात्र त्याने काहीही चोरले नसल्याचाच दावा केला. या पत्रकाराने चोरलेले चांदीचे चमचे दुसऱ्या पत्रकाराच्याच बॅगमध्ये ठेवले होते. त्याचे हे कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे पुसटशी जाणीवही त्याला नव्हती. अखेर हॉटेल व्यवस्थापनाने या प्रकाराची पोलिस तक्रार करण्याचा इशारा दिल्यानंतर भयभीत झाल्यामुळे त्याने चोरी केल्याचे मान्य केले. या पत्रकारास 50 पौंड दंड भरल्यानंतर मुक्त करण्यात आले. चोर पत्रकारांची ओळख उघड करण्यात आलेली नाही. एका बंगाली वृत्तसंस्थेने याधी या चोरांची नावे प्रसिद्ध केली होती. मात्र काही वेळानंतर संबंधित बातमी हटविण्यात आली.

बॅनर्जी यांनी गेल्या नोव्हेंबर महिन्यात लंडनचा दौरा केला होता. त्यावेळी हा लज्जास्पद प्रकार घडला. ""चोरी करणाऱ्या पत्रकारांना सीसीटीव्ही बंद असतील असेच वाटले. सामान्यत: बंगालमधील अशा ठिकाणचे सीसीटीव्ही बंदच असतात. इथेसुद्धा असेच असेल, असे त्यांना वाटले,'' अशी बोलकी प्रतिक्रिया एका पत्रकाराने या प्रकारावर बोलताना व्यक्त केली.

चोर पत्रकार हे ममता यांच्याबरोबर कायम परदेशी जाणारे पत्रकार आहेत. ममता यांच्या या अत्यंत उच्चस्तरीय दौऱ्यासाठी त्यांच्यासमवेत आलेले हे वरिष्ठ संपादक, पत्रकार होते.

Web Title: indian journalists west bengal mamata banerjee stealing london