मुलाच्या बचावासाठी वडील न्यायालयामध्ये

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

माझ्या मुलास चुकीच्या पद्धतीने या प्रकरणामध्ये गोवण्यात आले आहे.'' "अफ्स्पा'अंतर्गत येणाऱ्या भागामध्ये लष्कराचे एक पथक प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडत असताना माथेफिरू जमावाने जवानांवर हल्ला चढविला होता. या दगडफेकीत लष्कराच्या वाहनांचेही मोठे नुकसान झाले. आपल्या सहकाऱ्यांच्या सुटकेसाठी आणि लष्कराची आर्थिकहानी टाळण्यासाठी आदित्यकुमार यांना गोळीबार करावा लागला

नवी दिल्ली - भारतीय लष्करामध्ये मेजर हुद्यावर कार्यरत असलेल्या आदित्यकुमार यांच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या बचावासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. काही दिवसांपूर्वी शोपियॉंमध्ये दंगेखोर जमावावर गोळीबार केल्या प्रकरणी आदित्यकुमार यांच्याविरोधात जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी "एफआयआर' दाखल केला होता. हा "एफआयआर' रद्द करावा, अशी मागणी करणारी याचिका त्यांच्या वडिलांनी न्यायालयामध्ये सादर केली आहे.

दहा गढवाल रायफल्समध्ये कार्यरत असलेल्या आपल्या मुलाने केलेल्या गोळीबाराचे समर्थन करताना लेफ्टनंट कर्नल करमवीर सिंग म्हणाले, ""माझ्या मुलास चुकीच्या पद्धतीने या प्रकरणामध्ये गोवण्यात आले आहे.'' "अफ्स्पा'अंतर्गत येणाऱ्या भागामध्ये लष्कराचे एक पथक प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडत असताना माथेफिरू जमावाने जवानांवर हल्ला चढविला होता. या दगडफेकीत लष्कराच्या वाहनांचेही मोठे नुकसान झाले. आपल्या सहकाऱ्यांच्या सुटकेसाठी आणि लष्कराची आर्थिकहानी टाळण्यासाठी आदित्यकुमार यांना गोळीबार करावा लागला, असे त्यांनी आपल्या याचिकेमध्ये म्हटले आहे. ऍड. ऐश्‍वर्या भाटी यांच्या माध्यमातून यासंबंधीची याचिका न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आहे.

केंद्राच्या आदेशाचे पालन
सिंग यांनी आपल्या याचिकेमध्ये मागील वर्षी डीएसपी महंमद अयूब पंडित यांना माथेफिरू जमावाने कशापद्धतीने जिवंत जाळले होते याचाही उल्लेख केला आहे. काश्‍मीर खोऱ्यामध्ये लष्कराला प्रचंड हिंसक वातावरणामध्ये काम करावे लागत आहे हेच या प्रसंगाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसारच माझा मुलगा कर्तव्य बजावत असताना स्थानिक पोलिसांनी त्याच्याविरोधात "एफआयआर' दाखल केल्याचे करमवीरसिंग यांनी म्हटले आहे.

Web Title: indian military jammu kashmir