हिंदी महासागरात नौदलाची गस्त वाढली 

मंगळवार, 30 जून 2020

लडाखमधील चीनच्या घुसखोरीनंतर भारताने आपल्या तिन्ही सेनादलांना सावध राहण्यास सांगितले आहे. हिंदी महासागरात चिनी जहाजांच्या फेऱ्या वाढलेल्या भागात अधिक सावध राहण्याची सूचना नौदलाला देण्यात आली आहे. 

नवी दिल्ली - चीनबरोबरील सीमावादाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या आक्रमकतेला पायबंद घालण्यासाठी भारतीय नौदलाने हिंदी महासागरात गस्त वाढविली आहे. नौदलाने हिंदी महासागरातील आपल्या विविध तळांना दक्षतेचा इशारा दिला आहे. याशिवाय अमेरिका आणि जपानसारख्या मित्रदेशांच्या नौदलाबरोबरही सहकार्य वाढविले जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लडाखमधील चीनच्या घुसखोरीनंतर भारताने आपल्या तिन्ही सेनादलांना सावध राहण्यास सांगितले आहे. हिंदी महासागरात चिनी जहाजांच्या फेऱ्या वाढलेल्या भागात अधिक सावध राहण्याची सूचना नौदलाला देण्यात आली आहे. गेल्या दोन आठवड्यांत नौदलाने हिंदी महासागरात गस्ती मोहिमांची संख्या लक्षणीयरित्या वाढविली असून विविध तळांवरील जवानांची संख्याही वाढविली असल्याचे सूत्रांनी सांगितले. सागरातील चीनच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी गस्त वाढविल्याचे एका तज्ज्ञाने सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हिंदी महासागरात ज्या भागात चीनच्या पाणबुड्या आणि युद्धनौका सातत्याने ये-जा करतात, त्याच ठिकाणी भारताने शनिवारी जपानच्या नौदलाबरोबर सराव केला होता. भारताच्या आयएनएस राणा आणि आयएनएस कुलिश या युद्धनौकांनी या युद्धसरावात भाग घेतला होता. चीनची लडाखमधील घुसखोरी आणि दक्षिण चिनी समद्र, हिंदी महासागर येथे वर्चस्व निर्माण करण्याची महत्त्वाकांक्षा यामुळे या सरावाला महत्त्व होते. याशिवाय, चीनला रोखण्यासाठी भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि फ्रान्स या देशांची नौदले एकमेकांशी सहकार्य वाढवित आहेत.