संरक्षण, सागरी सहकार्याचा संकल्प भारत-इंडोनेशिया हिंद महासागरात बंदर विकसित करणार 

पीटीआय
गुरुवार, 31 मे 2018

हिंद महासागरात एक व्यूहरचनात्मक इंडोनेशियन नौदल बंदर विकसित करण्यासह भारत आणि इंडोनेशियाने बुधवारी संरक्षण आणि सागरी सहकार्य वाढविण्याचा संकल्प सोडला. 

जाकार्ता : हिंद महासागरात एक व्यूहरचनात्मक इंडोनेशियन नौदल बंदर विकसित करण्यासह भारत आणि इंडोनेशियाने बुधवारी संरक्षण आणि सागरी सहकार्य वाढविण्याचा संकल्प सोडला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जाकार्ताचे अध्यक्ष जोको विदोदो या दोन्ही नेत्यांदरम्यान येथे झालेल्या बैठकीत सुमात्रा बेट आणि मलाक्का सामुद्रध्वनीच्या तोंडावरील जागतिक व्यापारासाठी जहाजांची मोठ्या प्रमाणात रहदारी असलेल्या ठिकाणांपैकी एक सबांग येथे पायाभूत सुविधा आणि आर्थिक क्षेत्र विकसित करण्यासह अन्य अनेक मुद्यांवर चर्चा झाली. 

दरम्यान, अंदमान-निकोबार बेटे आणि सुमात्रा बेट यांच्या दरम्यान व्यापार, पर्यटन आणि लोकसंपर्क वाढविण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्यावरही भारत आणि इंडोनेशिया दरम्यान सहमती झाली. 

भारत हा एक व्यूहरचनात्मक संरक्षण भागीदार आहे आणि आम्ही सबांग बेट तसेच अंदमान बेटावर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी यापुढे सहकार्य वाढविण्याची भूमिका कायम ठेवू, असे विदोदो यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. 

भारत-असियान भागीदारी इंडो-पॅसिफिक क्षेत्र आणि त्याच्याही पुढे शांतता आणि प्रगतीची हमी देण्यास कारणीभूत ठरेल, असे मोदी यांनी हिंदीत वाचून दाखवलेल्या एका निवेदनात नमूद केले. 

चीनला टक्कर देण्यासाठी... 
चीनच्या प्रदेशातील वाढत्या सागरी प्रभावामुळे निर्माण झालेली गंभीर चिंता आणि असियान देशांशी भक्कम संबंध प्रस्थापित करण्याच्या मोदींच्या "ऍक्‍ट ईस्ट' धोरणाचा भाग म्हणून भारत-इंडोनेशिया दरम्यान हा निर्णय झाला असल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. 

तीस दिवसांचा मोफत व्हिसा 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियन नागरिकांसाठी तीन दिवसांच्या मोफत व्हिसाची घोषणा केली आणि नव्या भारताचा अनुभव घेण्यासाठी तसेच पुढील वर्षी प्रयागमध्ये होणाऱ्या कुंभसाठी भारतात येण्याचे निमंत्रण उपस्थितांना दिले. या वेळी त्यांनी मागील सरकारवर टीकास्त्र सोडताना सरकार म्हणून आमचे पहिले प्राधाय देशाला भ्रष्टाचारमुक्त, नागरिककेंद्रित आणि मैत्रीपूर्ण विकास करणे याला असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

इस्तिकलाल मशिदीला मोदींची भेट 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियाच्या आपल्या पहिल्या अधिकृत दौऱ्यादरम्यान आज इस्तिकलाल मशिदीला भेट दिली. या वेळी त्यांच्यासमवेत इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विदोदोही होते. जगातील सर्वांत मोठ्या मशिदींपैकी एक इस्तिकलाल मशिदीत जाऊन अतिशय आनंद झाला, असे ट्‌विट मोदींनी केले. त्याशिवाय मोदींनी इंडोनेशियाच्या स्वातंत्र्यासाठी हुतात्मा झालेल्यांच्या कालिबाता कब्रस्तानलाही भेट देऊन आदरांजली वाहिली. मोदींनी त्यानंतर जाकार्तामधील प्रतिष्ठित स्मारक "अर्जुन विजय रथ' पुतळ्यालाही भेट दिली. 

दहशतवादाचा तीव्र निषेध 
सीमेपलीकडील दहशतवादासह सर्व प्रकारच्या दहशतवादाचा भारत आणि इंडोनेशियाने आज तीव्र निषेध नोंदविला. दहशतवादी कारवाया आणि त्यांचा अर्थपुरवठा रोखण्यासाठी काम करण्यासाठी सर्व देशांनी एकत्र यावे, अशी विनंतीही करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष जोको विदोदो यांनी सुसंवाद आणि सद्‌भाव निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून कट्टरपंथीयता संपुष्टात आणणे तसेच शांतता प्रस्थापित करण्याचे महत्त्व यावर आपले मत व्यक्त केले. 

Web Title: Indian Ocean in the emerging geo-strategic context: examining India’s relations with its maritime South Asian neighbors