भारतातील मतदान यंत्रे जगात सर्वोत्तम

Indian voter machine is best in the world
Indian voter machine is best in the world

नवी दिल्ली - भारतात निवडणुकीदरम्यान वापरली जाणारी इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) पूर्णपणे सुरक्षित असून, त्यांच्यात फेरफार करता येत नाही, असा स्पष्ट निर्वाळा केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दिला आहे. मतदान यंत्रांमध्ये फेरफार होत असल्याचे सर्व आरोप निराधार असल्याचेही आयोगाने सांगितले आहे.

भारतामध्ये निवडणूक प्रक्रियेत गैरव्यवहार टाळण्यासाठी इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांचा मोठा उपयोग झाल्याचे समजले जाते. मात्र, उत्तर प्रदेश आणि इतर काही ठिकाणी भाजपला मिळालेल्या प्रचंड बहुमतानंतर विरोधकांनी मतदान यंत्रांवर ठपका ठेवला, त्यामुळे निवडणूक आयोगाने हे स्पष्टीकरण दिले आहे. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये 1982 मध्ये मतदान यंत्रांचा प्रथम वापर झाला. त्यानंतर आतापर्यंत विधानसभेच्या एकूण 107 आणि तीन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर झाला असून, या सर्व निवडणुका अत्यंत सुतळीतपणे पार पडल्या आहेत. तसेच, मतदान यंत्रांबाबतही आतापर्यंत कोणीही शंका उपस्थित केलेली नाही.

2014 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत देशभरात एकूण तब्बल 14 लाख मतदान यंत्रांचा वापर केला गेला. ही सर्व यंत्रे भारत इलेक्‍ट्रॉनिक लिमिटेड, बंगळुरू आणि इलेक्‍ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, हैदराबाद या दोन सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी तयार केली आहेत. बॅलटचा वापर झालेल्या अखेरच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सात ते आठ हजार टन कागदाचा वापर झाला. म्हणजे, जवळपास सव्वा लाख पूर्ण वाढलेली झाडे तोडून हा कागद तयार झाला होता.

यंत्राची वैशिष्ट्ये
यंत्रामध्ये असलेल्या एका छोट्या चिपमध्ये मतदानाबाबत सर्व माहिती जमा होते. तुम्ही मतदान करताच त्याची नोंद थेट या चिपमध्येच होते. ही चिप इतकी सुरक्षित आहे, की यंत्राची बॅटरी गेली, अथवा वीजपुरवठा खंडित झाला, तरी त्यामधील माहिती कायम राहते. यंत्रांमधील चिप मोठमोठ्या विदेशी कंपन्यांकडून मागविल्या जातात. मतदान केल्याची पावती मिळण्याची सुविधाही या यंत्रांमध्ये आता बसविली जात आहे. यंत्रामधील विशिष्ट सुविधेमुळे तुमचे मत गोपनीय राहते. मतदान यंत्रही उत्तम दर्जाच्या मालापासून तयार केलेले असल्याने त्याची सहजासहजी तोडफोड होत नाही. तसेच, कोणती यंत्रे कोणत्या मतदारसंघात जाणार, हे अखेरपर्यंत समजू शकत नाही, त्यामुळे त्यात आधीच फेरफार करून विशिष्ट उमेदवाराच्या बाजूनेच मते फिरविण्याची "किमया' कोणालाही करता येत नाही. एका अमेरिकी तज्ज्ञाने हॅक करण्याचे खुले आव्हान देत, तसे करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यात तो अयशस्वी ठरल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. सर्वोच्च न्यायालयानेही अनेक याचिकांवर सुनावणी घेत अंतिमतः मतदान यंत्रांच्या सुरक्षिततेवर शिक्कामोर्तब केले आहे.

जगातील सर्वोत्तम यंत्रे भारतात
जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतामध्ये मतदान यंत्रांचा सुरळीत वापर होत असताना अमेरिकेसारख्या प्रगत देशात अद्यापही बॅलेट पेपरचा वापर केला जातो. ब्राझील, नॉर्वे, जर्मनी, व्हेनेझ्युएला, कॅनडा, बेल्जियम, रोमानिया, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, इटली, आयर्लंड आणि फ्रान्स या देशांमध्येही "ईव्हीएम'चा वापर होतो. मात्र, येथेही सर्व यंत्रणा एकमेकांना इंटरनेटने जोडली गेलेली असल्याने त्यामध्ये अनेक बिघाड होतात आणि ही यंत्रे हॅकही होऊ शकतात. भारतातील यंत्रे मात्र साध्या कॅल्क्‍युलेटर यंत्रासारखी असून नेटवर्कशी जोडली गेलेली नसतात, त्यामुळे वापरण्यास सोपी असूनही हॅक करता येत नाहीत. ही यंत्रे जगातील इतर कोणत्याही मतदान यंत्रापेक्षा अधिक सुरक्षित असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com