मारहाण, हिंसाचारामुळे भारतीय महिलांच्या मृत्यूदराचे प्रमाण अधिक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

भारत व अमेरिकेतील हिंसाचारग्रस्त महिलांबाबत मृत्यूचे प्रमाण लक्षात घेताना त्यात मोठी तफावत आढळली. दोन्ही देशांमधील हिंसाचाराच्या घटनांच्या माहितीचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. यात हिंसाचारग्रस्त भारतीय महिलांवर योग्य वैद्यकीय उपचार होत नसल्याचे निदर्शनास आल्याचे संशोधकांनी सांगितले

लंडन - मारहाण, हिंसाचारामुळे भारतीय महिलांच्या मृत्यूदराचे प्रमाण अमेरिकेतील महिलांच्या तुलनेत 40 पटीने अधिक असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. मृत्युचा धोका वाढण्यामागे वैद्यकीय उपचारांकडे होणारे दुर्लक्ष हेही एक कारण असल्याचे सांगण्यात आले.

मुंबईतील टाटा समाजविज्ञान संस्था (टिस), अमेरिकेतील पिट्‌सबर्ग विद्यापीठ आणि स्वीडनमधील कॅरोलिन्सका संस्था यांनी संयुक्तपणे केलेल्या अभ्यासात हे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. भारत व अमेरिकेतील हिंसाचारग्रस्त महिलांबाबत मृत्यूचे प्रमाण लक्षात घेताना त्यात मोठी तफावत आढळली. दोन्ही देशांमधील हिंसाचाराच्या घटनांच्या माहितीचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. यात हिंसाचारग्रस्त भारतीय महिलांवर योग्य वैद्यकीय उपचार होत नसल्याचे निदर्शनास आल्याचे संशोधकांनी सांगितले.

जोडीदाराने केलेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये चारपैकी फक्त एकाच महिलेवर उपचार होत असल्याचे व तिची काळजी घेत असल्याचे सिद्ध होत असल्याकडे या अभ्यासात लक्ष वेधले आहे. अशा महिलांना रुग्णालात दाखल करण्यापूर्वी त्यांची काळजी घेण्यासाठीची व्यवस्था अमेरिकेप्रमाणे भारतात विकसित झालेली नाही. यामुळे अल्प उत्पन्न गटातील महिलांना आवश्‍यक उपचारांवर खर्च करणे शक्‍य होत नाही, असेही संशोधकांनी म्हटले आहे.

या तुलनात्मक अभ्यासात विविध कारणांमुळे जखमी झालेल्या पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण भारतीय महिला किंवा अमेरिकेतील पुरुष व महिलांपेक्षा जास्त आहे. अशा घटनांमध्ये अमेरिकन पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण तेथील महिलांपेक्षा तीन टक्‍क्‍याने जास्त आहे. रस्ते अपघातांत महिला व पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण भारताचा विचार करता अमेरिकेत पाच ते सात पटींनी कमी आहे, असा दाखलाही देण्यात आला आहे. 2013 ते 2015 या काळात जखमीवस्था, रस्ते अपघात, हिंसाचार आदी कारणांमुळे भारत झालेल्या 11 हजार 670 व अमेरिकेतील 14 हजार 155 दुर्घटनांच्या घटनांवर आधारित अहवाल संशोधकांचे पथकाने तयार केला आहे.

Web Title: indian women domestic violence medical help