नंदनवनाला जोडणार देशातील सर्वांत मोठा बोगदा

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मार्च 2017

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील देशातील सर्वांत मोठा बोगदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाला अर्पण करण्यात येणार आहे. या बोगद्यामुळे जम्मू व श्रीनगरमधील अंतर 30 किलोमीटरने कमी होणार आहे.

जम्मू - जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील देशातील सर्वांत मोठा बोगदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाला अर्पण करण्यात येणार आहे. या बोगद्यामुळे जम्मू व श्रीनगरमधील अंतर 30 किलोमीटरने कमी होणार आहे.

जम्मू-काश्‍मीर महामार्गावरील चेनानी-नसरी बोगद्याचे उद्‌घाटन मोदी यांच्या हस्ते 2 एप्रिल रोजी होणार आहे. हा प्रकल्प देशाला अर्पण केल्यानंतर पंतप्रधान जाहीर सभेत भाषण करणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली. 286 कि.मी.अंतराच्या चारपदरी महामार्गावर प्रकल्पाचा भाग असलेल्या या बोगद्याचे हिमालयाच्या पर्वतराजीतील 9.2 कि.मी. लांबीच्या कामाचा प्रारंभ 32 मे 2011 सुरू झाला होता. यासाठी तीन हजार 720 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. 1200 मीटर उंचीवरील या बोगद्यात जगातील सर्वोत्कृष्ट बोगदा व्यवस्थापन नियंत्रण यंत्रणेचा वापर केला आहे. यात आग नियंत्रण, वायुवीजन, संपर्क, सिग्नल व इलेक्‍ट्रिक यंत्रणा स्वयंचलित प्रणालीवर आधारित आहे. ""या बोगद्यामुळे जम्मू व श्रीनगर या काश्‍मीरच्या दोन राजधानींमधील प्रवासाचा वेळ अडीच तासांनी कमी होणार आहे. चेनानी व नसरी हे अंतर सध्या 41 कि.मी. आहे. बोगद्यामुळे ते 10.9 कि.मी. एवढे कमी होणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते बोगद्याचे अधिकृत उद्‌घाटन झाल्यानंतर हा बोगदा भारतीय रस्ते प्राधिकरणाच्या (एनएचएआय) ताब्यात देण्यात येणार आहे,'' असे त्यांनी सांगितले.

या बोगद्याची चाचणी 9 व 15 मार्च रोजी घेण्यात आली आहे. गर्दीच्या आणि कमी गर्दीच्या वेळांमध्ये ही चाचणी झाल्याचे "इन्फ्रास्ट्रक्‍चर लिजिंग अँड फायनान्शिअल सर्व्हिसेस'चे प्रकल्प संचालक ज. एस. राठोड यांनी सांगितले. हिवाळ्यात पटणीटॉप येथे हिमवर्षाव व दरड कोसळण्याच्या घटनांमुळे राष्ट्रीय महामार्ग 1ए-वरील वाहतूक बंद होते. या बोगदा अधिकृतपणे सुरू झाला की या रस्त्यावरील "ट्रॅफिक जॅम'चे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.

या बोगद्यातून जाण्यासाठी हलक्‍या वाहनांना 55 रुपये; तर जाण्या-येण्यासाठी 85 रुपये टोलचे शुल्क आकारण्यात येणार आहे. मासिक शुल्क एक हजार 870 रुपये असेल. मिनी बससारख्या मोठ्या वाहनांसाठी एका बाजूसाठी 90 रुपये; तर दोन्ही बाजूंसाठी 135 रुपये टोल असेल. संगणकीकृत कार्यालयातून या बोगद्यातील वाहनांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. यासाठी 75 मीटरच्या अंतरावर 124 सीसीटीव्ही कॅमेरे; तसेच बोगद्यात 24 तास विजेसाठी त्रिस्तरीय यंत्रणा उभारली आहे. बोगद्यात वाहनांचा वेग ताशी 50 कि.मी. ठेवण्यास परवानगी असेल. मोबाईल नेटवर्कबरोबरच एफएम रेडिओची सोयही करण्यात आल्याची माहिती राठोड यांनी दिली.

या बोगद्यामुळे पटणीटॉप येथील जैवविधतेचे संरक्षण होण्यास मदत होणार असून, जम्मू व काश्‍मीरमधील जनतेला संपर्क साधणे सहज होणार आहे. त्याचबरोबर किश्‍तवाड, दोडा, भादरवा या गावांनाही चांगले संपर्क साधन उपलब्ध होणार आहे.

असा आहे बोगदा...
9 कि.मी.
एकूण लांबी

3,720 कोटी रुपये
एकूण खर्च

27 लाख रुपये
रोजच्या इंधनात बचत

Web Title: India's Big tunnel between Jammu and Shrinagar