भारताचा जन्मदर नैसर्गिक वाढीएवढाच

वृत्तसंस्था
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

- सक्तीच्या कुटुंबनियोजनाची गरज नसल्याचे तज्ज्ञांचे मत 
- जन्मदरात दहा वर्षांत 21.4 टक्के घट 
- मुस्लिमांचा जन्मदरही घटला 
- काश्‍मीमधील जन्मदरात सर्वाधिक घट 

मुंबई : भारताचा जन्मदर 2.2 असून तो लोकसंख्येच्या नैसर्गिक वाढीपर्यंत पोहोचला आहे. 26 वर्षांत तो 3.4 वरून 2.2 वर आला आहे. भारतातील बालमृत्यू आणि अर्भक मृत्यूचे सध्याचे प्रमाण पाहता; तसेच लोकसंख्येचा समतोल राखण्यासाठी 2.1 हा जन्मदर योग्य मानला जातो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात वाढत्या लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर पुन्हा सक्तीच्या कुटुंबनियोजनाची चर्चा सुरू होण्याची शक्‍यता आहे; मात्र सक्तीच्या कुटुंबनियोजनाची आता गरज राहिलेली नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ही सक्ती नसतानाही भारतातील जन्मदर एका दशकात 21.4 टक्‍क्‍यांनी घटला आहे, याकडे लोकसंख्या विज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांनी लक्ष वेधले. दरम्यान, देशातील पाच राज्यांचा जन्मदर देशाच्या जन्मदरापेक्षा अधिक आहे. बिहारचा जन्मदर सर्वाधिक (3.2); तर दिल्लीचा जन्मदर सर्वात कमी (1.5) आहे. महाराष्ट्राचा जन्मदर 1.7 असल्याचे जनगणना आयुक्तालयामार्फत जाहीर करण्यात आलेल्या सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टिमच्या सांख्यिकी अहवालात (2017) नमूद आहे. 

शहरी भागांमधील जन्मदर 1.7; तर ग्रामीण भागातील 2.4 आहे. एक दाम्पत्य किती मुलांना जन्म देते, त्यावरून जन्मदर ठरतो. साधारणतः दाम्पत्याने दोन मुलांना जन्म दिल्यास, त्यातही एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास लोकसंख्येचा समतोल राखणे शक्‍य होते, असे तज्ज्ञांचे मत आहे. 

जन्मदरात दहा वर्षांत 21.4 टक्के घट 
भारतातील जन्मदरात दहा वर्षांत 21.4 टक्के घट झाली आहे. जनगणना आयुक्तालयाने जाहीर केलेल्या अहवालानुसार देशाचा जन्मदर 2005-06 मध्ये 2.8 होता; तर तो 2015-17 मध्ये 2.2 पर्यंत आला. सर्वच राज्यांतील जन्मदरात चांगली घट होत आहे, असे या अहवालातून स्पष्ट होते. संपूर्ण देशाचा विचार केल्यास ग्रामीण भागांतील जन्मदरात 19.4 टक्के घट झाली आहे. 

मुस्लिमांचा जन्मदरही घटला 
मुस्लिल समाजातील जन्मदर भारतातील सर्वाधिक जन्मदर आहे. मात्र त्यातही घट होऊ लागली असल्याचे राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. या सर्वेक्षणाच्या 2005-06 च्या अहवालात मुस्लिम समाजातील जन्मदर 3.40 होता; तो 2015-16च्या सर्वेक्षणात 2.62 पर्यंत आला. हिंदू धर्मातील जन्मदर 2.59 वरून 2.13 पर्यंत आला आहे. 

काश्‍मीमधील जन्मदरात सर्वाधिक घट 
जम्मू-काश्‍मीरमधील जन्मदरात सर्वाधिक म्हणजे 30.4 टक्‍क्‍यांची घट झाली आहे. बिहारच्या तुलनेने हा दर निम्मा आहे. बिहाराचा जन्मदर 3.2 तर जम्मू-काश्‍मीरचा 1.6 आहे. 

जन्मदर घटण्याची कारणे 
- साक्षरतेचे वाढलेले प्रमाण 
- रोजगाराची कमी उपलब्धता 
- महागाई 
- कुटुंबनियोजनाच्या साधनांबाबत जागरूकता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India's birth rate is the same as natural growth