चिंताजनक ! कोरोनाग्रस्तांची संख्या ६ लाखांच्या वर

Sakal | Thursday, 2 July 2020

देशात कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांची संख्या ६ लाखांच्या वर गेली आहे असून आतापर्यंत देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ६०१९५२ झाला आहे. यापैकी २५७६१२ लोकांनी कोरोनावर मात केली आहे. तर १७७८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या २२६४८९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होताना दिसत नाही. देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला आहे. देशात कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांची संख्या ६ लाखांच्या वर गेली आहे असून आतापर्यंत देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ६०१९५२ झाला आहे. यापैकी २५७६१२ लोकांनी कोरोनावर मात केली आहे. तर १७७८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या २२६४८९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

देशात कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या ही महाराष्ट्रात आहे. त्यातच मुंबई आणि उपनगरमध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्याने होऊ लागला आहे. त्यामुळे प्रशासनापुढे आता नवं आव्हान तयार झालं आहे. लोकं मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागल्याने कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. महाराष्ट्रात आता ज्या महापालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा भागात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अनेक महापालिकांनी १० दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला आहे.

राजधानी दिल्लीतही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत दिल्लीत ६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत मृतांचा आकडा २८०३ वर पोहचला आहे. दिल्लीत आतापर्यंत ५९९५२ लोक बरे झाले आहेत. तर, गेल्या २४ तासात गुजरात आणि कर्नाटकात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. या दोन राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४  तासांत गुजरातमध्ये कोरोनाव्हायरस संसर्गाचे सर्वाधिक ६७५ रुग्ण आढळले आहेत. आता राज्यात कोरोनाची लागण झालेल्यांची एकूण संख्या ३३,३१८ वर गेली आहे. गुजरातमध्ये बुधवारी २१ लोकांचा मृत्यू झाला असून राज्यात मृतांची संख्या १८६९ झाली आहे. या व्यतिरिक्त रुग्णालयातून ३६८ रुग्ण बरे झाले असून ठणठणीत झालेल्या रुग्णांची संख्या २४,०३८ झाली आहे. बुधवारी अहमदाबादमध्ये संसर्गाची २५१ प्रकरणे पुढे आल्याचे आरोग्य विभागाने निवेदन जारी करताना सांगितले. तर सुरत येथे २०१ रुग्णांची नोंद झाली आहे. सुरतमध्ये पहिल्यांदाच २०० पेक्षा जास्त कोरोना प्रकरणे नोंदवली गेली आहेत. अहमदाबादमध्येच कोरोना विषाणू रुग्णांची एकूण संख्या २११२८ तर सुरतमध्ये ५०३० इतकी झाली आहे.

तसेच, गेल्या २४ तासांत कर्नाटकात १२७२ नवीन रुग्ण नोंदले गेले, जे एका दिवसात सर्वाधिक नोंद झाले आहे. कोरोना विषाणू संक्रमणामुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. संसर्गाच्या नवीन घटनांसह राज्यात संसर्ग झालेल्यांची संख्या १६,५१४ पर्यंत पोहोचली आणि संसर्गामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या २५३ वर पोचली. बुधवारी नोंदविण्यात आलेल्या१२७२ नवीन प्रकरणांपैकी ७३५ प्रकरणे एकट्या बंगळुरु शहरातील आहेत. राज्यात कोविड -१९ च्या एकूण १६,५१४ घटनांची नोंद झाली असून त्यामध्ये २५३ जणांच्या मृत्यूंचा समावेश आहे, तर ८०६३ लोक बरे झाले आहेत.