वैयक्तिक टीका मोदींना शोभत नाही- राहुल गांधी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 मे 2018

राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर औरद येथिल प्रचारसभेत जोरदार हल्ला केला.

औरद (कर्नाटक)  - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझ्याविरोधात प्रचारादरम्यान वापरत असलेली भाषा त्यांच्या पदाला शोभत नाही, मोदींनी माझा कितीही अवमान केला, तरीसुद्धा मी त्यांच्याविरोधात वैयक्तिक शेरेबाजी करणार नाही, जाहीरसभेत बोलताना मोदींनी शब्दांचा योग्य वापर करावा, अशी टीका कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज येथील सभेत बोलताना केली. 

राहुल म्हणाले, ""पंतप्रधान राफेल करार आणि नीरव मोदीबाबत काहीही बोलायला तयार नाहीत, त्यांना केवळ वैयक्तिक टीका करण्यातच रस आहे. मोदी घाबरतात तेव्हा ते वैयक्तिक टीकेवर येतात. हाच त्यांच्यातील आणि माझ्यातील फरक आहे. मी पंतप्रधानपदाचा आदर ठेवतो. मी त्यांच्यावर कधीच वैयक्तिक टीका करणार नाही. मी भारतीय असून, ते माझ्या देशाचे पंतप्रधान आहेत.

पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त कारभाराचा डंका वाजविणाऱ्या मोदींनीच रेड्डी बंधूंसारख्या खाण माफियांना प्रचाराच्या मैदानात उतरविले. जीसएसटीसारखा गब्बरसिंग टॅक्‍सदेखील आणला. तुम्ही तर अख्खी गब्बरसिंगची गॅंगच तैनात केली आहे. आता गब्बर, सांभा, कालिया, असे सगळेच आहेत. ही रेड्डी बंधूंची गॅंग कधीकाळी तुरुंगामध्ये होती. या मंडळींना विधिमंडळात आणण्यासाठी त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हीच मंडळी आम्ही भ्रष्टाचाराच्याविरोधात लढत आहोत, असे सांगताना दिसतात. कर्नाटकची निवडणूक ही मोदी आणि राहुल गांधी यांच्यासाठी नसून ती राज्यातील जनतेच्या भविष्यासाठी आहे.''

Web Title: Individual criticism does not suit Modi says rahul gandhi