इंदूर देशातील सर्वांत स्वच्छ शहर 

इंदूर देशातील सर्वांत स्वच्छ शहर 

नवी दिल्ली (पीटीआय) : मध्य प्रदेशातील इंदूर शहराला देशातील सर्वांत स्वच्छ शहर म्हणून सलग तिसऱ्यांदा मान मिळाला आहे. राजधानीच्या श्रेणीत भोपाळ शहराची, तर छत्तीसगडला स्वच्छतेच्या कामात सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य म्हणून निवडण्यात आले. भारत सरकारच्या वतीने स्वच्छता सर्व्हेक्षण-2019 पुरस्कार आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सुमारे 70 श्रेणीतील स्वच्छ शहरांच्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. 

देशातील सर्वांत स्वच्छ शहराच्या श्रेणीत इंदूरनंतर छत्तीसगडच्या अंबिकापूर शहराची निवड झाली. कर्नाटकातील म्हैसूर हे तिसऱ्या स्थानावर आहे. दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या श्रेणीत अहमदाबाद, तर पाच लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असणारे उज्जैन स्वच्छ शहर म्हणून पहिल्या स्थानावर राहिले. छत्तीसगडचे नगरविकास मंत्री डॉ. शिवकुमार डहरिया यांनी राष्ट्रपतींकडून सर्वोत्तम कामगिरीचा पुरस्कार प्राप्त केला. स्वच्छतेच्या दिशेने सर्वांत वेगाने आणि नियोजनबद्ध काम केल्याने छत्तीसगड राज्याला हा पुरस्कार देण्यात आला. छत्तीसगडच्या विविध नगरपालिकांनादेखील वेगवेगळ्या श्रेणीत पुरस्कार मिळाले आहेत. रायपूर महानगरपालिकेचे महापौर प्रमोद दुबे यांनी छत्तीसगडसाठी ही मोठी गौरवाची बाब असल्याचे म्हटले आहे. 2019 च्या स्वच्छता सर्व्हेक्षण पुरस्कारासाठी दिल्लीतून गेलेल्या पथकाने छत्तीसगडमध्ये बराच काळ अभ्यास केला. आठवड्यापेक्षा अधिक काळ वेगवेगळ्या क्षेत्रांचे सर्व्हेक्षण केले. शहर विकास मंत्रालयाच्या वतीने देशातील वेगवेगळ्या राज्यांतील 4 हजार 237 शहरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यानंतर वेगवेगळ्या श्रेणीतील रॅकिंग जाहीर करण्यात आली. 

सत्तर श्रेणीत पुरस्काराचे वितरण 
स्वच्छता सर्व्हेक्षण-2019 नुसार 70 श्रेणीत पुरस्कार दिले. सर्वांत स्वच्छ शहराबरोबरच स्टार रॅकिंग, झिरो वेस्ट मॅनेजमेंटचा पुरस्कारदेखील इंदूरला मिळाला. मध्य प्रदेशला एकूण 19 पुरस्कार मिळाले. सर्व्हेक्षणात सर्वांत उच्च स्थानावर असलेल्या इंदूरला स्वच्छतेसाठी विशेष अनुदान मिळणार आहे. गेल्या वर्षी इंदूरला 20 कोटी रुपये मिळाले होते. 

उत्कृष्ट स्वच्छतेचे राज्य छत्तीसगड 
केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्या माहितीनुसार, छत्तीसगड, झारखंड आणि महाराष्ट्र राज्यदेखील स्वच्छतेच्या संदर्भात वेगाने विकसित होत आहेत. या तिन्ही राज्यांना बेस्ट परफॉर्मिंग स्टेटस पुरस्कार मिळाले आहेत. छत्तीसगड आघाडीवर आहे, तर दुसऱ्या स्थानावर झारखंड आणि नंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. 

इंदूरचे वैशिष्ट्ये 
पाच वर्षांपूर्वी इंदूर स्वच्छतेबाबत 149 व्या स्थानावर होते. मात्र, आज स्वच्छता हा शहराचा ब्रॅंड बनला आहे. स्वच्छतेत देशात पहिल्या स्थानावर आलेल्या इंदूरला देशातील 300 शहराच्या प्रतिनिधींनी भेट दिली असून, त्यांनी स्वच्छतेच्या कार्यप्रणालीचे अध्ययन केले आहे. शंभराहून अधिक महानगरपालिकांनी इंदूरचा अभ्यास केला आहे. यात जम्मू -काश्‍मीरपासून चेन्नई, पुणे, बंगळूर, जयपूर आदींचा समावेश आहे. 

स्वच्छता पुरस्कार 
सर्वाधिक स्वच्छ शहर : इंदोर 
सर्वांत स्वच्छ राजधानी : भोपाळ 
सर्वांत मोठे स्वच्छ शहर : अहमदाबाद 
मध्यम लोकसंख्येचे शहर : उज्जैन 
सर्वांत छोटे स्वच्छ शहर : एनडीएमसी दिल्ली 
सर्वांत स्वच्छ कॅन्टोन्मेंट : दिल्ली कॅन्टोन्मेंट 
गंगा नदीवरील स्वच्छ शहर : गौचर, उत्तराखंड 
वेगाने विकसित होणारे मध्यम शहर : मथुरा- वृंदावन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com