इंदूर-मनमाड रेल्वे मार्गाच्या समझोता करारावर सह्या 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली : इंदूर-मनमाड रेल्वेमार्ग प्रकल्पाच्या समझोता करारावर आज येथे सह्या करण्यात आल्या. यामुळे इंदूर व मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदराचा थेट संपर्क प्रस्थापित होणार आहे. 362 किलोमीटर लांबीच्या या रेल्वेमार्गामुळे इंदूर-मुंबई दरम्यानचे अंतर 171 किलोमीटरने कमी होणार आहे. इंदूर-मनमाड-जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट असा हा प्रकल्प असेल. 

केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत हा करार झाला. सागरमाला प्रकल्पांतर्गत हा रेल्वेमार्ग होणार आहे. 

या प्रकल्पामुळे सहा हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, अशी माहिती या वेळी देण्यात आली. त्याचप्रमाणे या नव्या मार्गामुळे त्याच्या दोन्ही बाजूंना कृषी व उद्योगांची नवी केंद्रे उभारणे शक्‍य होणार आहे. या मार्गामुळे दिल्ली-चेन्नई व दिल्ली-बंगळूर दरम्यानचे अंतरही 325 किलोमीटरने कमी होणार आहे. अंतर कमी झाल्याने या दीर्घ पल्ल्याच्या मार्गावरील प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे. इंदूर-मुंबईदरम्यान वर्षाला 47 हजार कंटेनर्सची वाहतूक होत असते. परंतु या नव्या मार्गामुळे आधीच्या अतिव्यस्त रेल्वेमार्गावरील कोंडीही कमी होण्यास मदत होणार आहे. 

प्रकल्पासाठी... 

- अपेक्षित खर्च ः 8574.79 कोटी रुपये 
- महाराष्ट्र-मध्य प्रदेश करणार प्रत्येकी 15 टक्के खर्च 
- उर्वरित 70 टक्के खर्चाचा भार जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टतर्फे 
- मार्गाची लांबी ः 362 किलोमीटर 
- महाराष्ट्रात ः 186 किलोमीटरचा भाग 
- प्रकल्पासाठी अपेक्षित जमीन ः 2008 हेक्‍टर 
- महाराष्ट्रातील क्षेत्र ः 964 हेक्‍टर 

Web Title: Indore Manmad rail agreement signed