काश्मीरमध्ये घुसखोरीत घट; 92 दहशतवाद्यांचा खात्मा

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 जुलै 2017

युपीए सरकारच्या काळात वर्षभरात 2012 मध्ये 72, तर 2013 मध्ये 67 दहशतवाद्यांना मारण्यात आले होते. या तुलनेत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या काळात 2014 मध्ये 110, 2015 मध्ये 108 आणि 2016 मध्ये 150 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. 

नवी दिल्ली - काश्मीर खोऱ्यात सीमेवरून भारतीय हद्दीत होणाऱ्या घुसखोरीमध्ये घट झाली असून, या वर्षात भारतीय लष्कराकडून 92 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा जास्त दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे.

काश्मीर खोऱ्यात भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांविरोधात धडक कारवाई करण्यात येत आहे. अनेकवेळा लष्कराने सीमेपलिकडून भारतीय हद्दीत घुसखोरी करत असल्याचे कट उधळून लावले आहेत. गेल्या वर्षी याच (जानेवारी ते जून) कालावधीत लष्कराने 79 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या कालावधीत संपूर्ण वर्षभरात ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपेक्षा जास्त दहशतवादी मागील दोन वर्षांच्या सुरुवातीच्या सहा महिन्यांमध्ये मारले गेले होते. आता या वर्षाच्या सुरवातीच्या सहा महिन्यांमध्ये 92 दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. 

युपीए सरकारच्या काळात वर्षभरात 2012 मध्ये 72, तर 2013 मध्ये 67 दहशतवाद्यांना मारण्यात आले होते. या तुलनेत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या काळात 2014 मध्ये 110, 2015 मध्ये 108 आणि 2016 मध्ये 150 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. 

या वर्षी 2 जुलैपर्यंत कंठस्नान घालण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे प्रमाण 2014 आणि 2015 मध्ये कंठस्नान घालण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या संख्येच्या जवळपास जाणारे आहे,’ अशी माहिती गृह मंत्रालयातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली. लष्कर, केंद्रीय राखीव पोलीस दल, राज्य सरकार आणि गुप्तचर यंत्रणातील समन्वयामुळेच दहशतवाद्यांविरोधातील कारवाई जोरात सुरु असल्याचेदेखील या अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Infiltration down, 92 terrorists killed in J&K this year