नावीन्यपूर्ण संशोधनांनी कोरोनांशी लढा

Technology
Technology

कमी खर्चिक व्हेंटिलेटर, निर्जंतुकीकरणासाठी ड्रोन्स, औषधे व खाद्यपदार्थांच्या वितरणासाठी रोबो, रुग्णांना लांबून तपासण्यासाठी स्पेशल स्टेथोस्कोप, नोटा आणि किराणा मालाचे निर्जंतुकीकरण करणाऱ्या पेट्या आणि यासह इतर अनेक नावीन्यपूर्ण संशोधन कोविड-१९ विरोधातील लढ्याला बळ देत आहेत.

‘गोकोरोनागो’ आणि ‘संपर्कओमीटर’ यासारखी विविध मोबाईल ॲप्लिकेशन संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात येण्यापासून तुमचा बचाव करीत आहेत. तसेच, प्रशासनाला  क्वारंटाइनच्या नियमांचा भंग करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेणे, अशा ॲपमुळे शक्य होत आहे. आयटी आणि आयआयएससी यासारख्या संस्थांनी अशी ॲप बनविली आहेत.

थर्मल स्क्रिनिंगसाठी ड्रोन
कोरोनावर वीसहून अधिक संस्था लस बनवण्यासाठी संशोधन करत आहेत. देशातील प्रमुख आयआयटींनी यासाठी संशोधन केंद्रे सुरू करून नावीन्यपूर्ण संशोधन करण्यावर भर दिला आहे. यात आयआयटी गुवाहाटीने विविध प्रकारची ड्रोन विकसित केली आहेत. यातील एका ड्रोनच्या साह्याने मोठ्या भागावर निर्जंतुकीकरण केले जाते. तसेच, आणखी एका ड्रोनच्या मदतीने मोठ्या समूहाचे थर्मल स्क्रीनिंग केले जाते. यातून मानवी हस्तक्षेपाशिवाय कोरोनाची लक्षणे असलेला रुग्ण कळणे शक्य होते. या ड्रोनमध्ये ध्वनिवर्धक असल्याने मोठ्या समूहाला सूचना देणे सोपे होते.

ॲक्रलोसॉर्ब, बबल हेल्मेट
त्रिवेंद्रममधील श्री चित्रा तिरूनाल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी या संस्थेने नवीन तीन उपकरणे शोधली आहेत. यातील ॲक्रलोसॉर्ब उपकरण शरीरातील द्रवाचे संकलन करून ते सुरक्षितपणे नष्ट करते. हे उपकरण त्याच्या वजनाच्या २० पट अधिक द्रवपदार्थ शोषून घेते. तसेच यामुळे निर्जंतुकीकरणही होते. या संस्थेने आयसोलेशन पॉड विकसित केला आहे. या पॉडमुळे रुग्णांचा इतरांशी संपर्क येत नाही. हा पॉड टेलिफोन बूथ सारखा असून, यात रुग्णांची तपासणी केली जाते. रुग्णाच्या तपासणीनंतर याचे निर्जंतुकीकरण केले जाते. याचबरोबर संस्थेने बबल हेल्मेट विकसित केले आहे. हे हेल्मेट पारंपरिक ऑक्सिजन मास्कला पर्याय म्हणून वापरता येते.

सोशल डिस्टन्सिंगसाठी ‘कवच’
याचबरोबर आयआयटी रूडकी आणि कानपूर यांनी कमी खर्चाचे व्हेंटिलेटर विकसित केले आहेत. पंजाबमधील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमधील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने कवच नावाचे उपकरण विकसित केले आहे. हे उपकरण सोशल डिस्टन्सिंगसाठी उपयोगी ठरत आहे. या उपकरणामुळे आजूबाजूच्या लोकांसोबत एक मीटर अंतर ठेवणे सोपे जाते. हे उपकरण गळ्यात अडकवता येते. एक मीटरपेक्षा अंतर कमी झाल्यास त्याचा बझर वाजू लागतो.

औषधांसाठी रोबो
आणखी एका संशोधकांच्या गटाने दोन रोबो विकसित केले आहेत हे रोबो संसर्ग झालेल्या रुग्णांना अन्न व औषधे वितरित करण्याचे काम करीत आहेत. यामुळे आरोग्य सेवक रुग्णांच्या थेट संपर्कात येत नाहीत आणि आणि त्यांना संसर्ग होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.

डिजिटल स्टेथोस्कोप
आयआयटी मुंबईने डिजिटल स्टेथोस्कोप विकसित केला असून, हा काही अंतरावरून समोरच्या व्यक्तीच्या ह्रदयाचे ठोके तपासतो आणि त्यांचे मोजमाप करतो. यामुळे संशयित रुग्णाला तपासताना संसर्गाचा धोका टाळून वैद्यकीय सेवकांना तपासणी करता येते. रुग्णाच्या छातीचे ठोके डॉक्टरला ब्लूटूथच्या सहाय्याने ऐकता येतात. 

निर्जंतुकीकरणासाठी पेटी
आयटी रोपरने एक पेटीसारखे उपकरण विकसित केले आहे. यात अतिनील किरणांचा वापर करण्यात आला असून, यामुळे या पेटीत ठेवल्या जाणाऱ्या वस्तूंचे निर्जंतुकीकरण होते. यात किराणा वस्तू आणि नोटा ठेवल्या जाऊ शकतात. या पेटीची किंमत पाचशे रुपयांहून कमी असून, यात वस्तू निर्जंतुक करण्यासाठी तीस मिनिटे लागतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com