'पुलवामानंतर दहशतवादी पुन्हा हल्ल्याच्या तयारीत'

वृत्तसंस्था
बुधवार, 15 मे 2019

पाकिस्तान आता नेपाळ सीमेमार्गे दहशतवाद्यांना भारतात पाठवण्याचा प्रयत्न करत आहे. तीन दहशतवादी नेपाळमार्गे भारतात घुसखोरी करण्यात यशस्वी ठरले आहेत.

नवी दिल्लीः पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवादी पुन्हा भारतात मोठ्या हल्ल्याच्या तयारीत आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना भारतात घुसवण्यासाठी नेपाळ सीमेचा वापर करत आहे, अशी माहिती गुप्तचर विभागाने संरक्षण विभागाला दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी बौद्ध पौर्णिमेला हल्ला करण्याची तयारी करत आहे. यासाठी महिला दहशतवाद्यांचा वापर केला जाऊ शकतो. पाकिस्तान आता नेपाळ सीमेमार्गे दहशतवाद्यांना भारतात पाठवण्याचा प्रयत्न करत आहे. तीन दहशतवादी नेपाळमार्गे भारतात घुसखोरी करण्यात यशस्वी ठरले आहेत. दहशतवादी घुसखोरी करून उत्तर काश्मीरमधील बांदिपोरात दाखल झाले आहेत. त्या दहशतवाद्यांना बांदिपोऱ्यात पोहोचवण्यासाठी साजिद मीर ऊर्फ हैदर नावाच्या दहशतवाद्याने मदत केली आहे. साजिद मीर ऊर्फ हैदर हा दहशतवादी सोपोरमध्ये सक्रिय आहे. साजिद आपल्या इतर साथीदारांबरोबर नेपाळच्या काठमांडूमध्ये दाखल झाला होता. सोबत त्याने तीन दहशतवाद्यांना घेऊन बांदिपोरा येथे दाखल झाला आहे. गेल्या दोन वर्षांत नेपाळमार्गे दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी केल्याच्या घटना समोर आल्या नव्हत्या. मात्र, या वर्षी पहिल्यांदाच नेपाळमार्गे दहशतवाद्यांनी घुसखोरी केली आहे. एप्रिल महिन्यात पाकिस्तानने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केलेला नाही. बर्फवृष्टी होत असताना दहशतवादी घुसखोरी करतात.

श्रीलंकेमध्ये दहशतवादी हल्ले झाल्यानंतर त्यांनी आता भारत व बांगलादेश व म्यानमारमध्ये बौद्ध पोर्णिमेला हल्ले करण्याचा कट रचला आहे. दहशतवादी हल्ले करण्यासाठी महिला दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले होते. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर तणाव सुरूच आहे. भारतीय लष्करही घुसखोरांना रोखण्यासाठी पूर्ण तयारीत आहे. यामुळे पाकिस्तान दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यासाठी नवनव्या मार्गांचा वापर करत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Intelligence Agencies On Alert After Three Terrorists Enter jammu kashmir