Budget 2019 : "बहुत खूब'ला "झूट बोले'चे प्रत्युत्तर...

Budget 2019 : "बहुत खूब'ला "झूट बोले'चे प्रत्युत्तर...

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : निवडणुकीसाठी शेतकरी, कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांवर अर्थमंत्र्यांनी पाडलेला सवलतींचा पाऊस...त्यावर "बहुत खूब' अशी सत्ताधारी बाकांवरून समरसून मिळणारी दाद...चेहरा पडलेल्या विरोधकांची अर्थमंत्र्यांना उद्देशून "झूट बोले कौआ काटे'ची शेरेबाजी...अर्थसंकल्पातून विरोधकांवर "सर्जिकल स्ट्राइक' झाल्याची सत्ताधाऱ्यांची टोलेबाजी आणि अखेरीस रंगलेली "मोदी...मोदी' घोषणाबाजी...अशा वातावरणात मोदी सरकारचा अखेरचा हंगामी अर्थसंकल्प लोकसभेत मांडला गेला. 

हंगामी अर्थमंत्री या नात्याने पहिलाच अर्थसंकल्प मांडणारे मंत्री पीयूष गोयल सभागृहात लवकरच दाखल झाले असले तरी भाषणाची प्रत सोबत आणायचे विसरले होते. अर्थात लगेचच प्रत उपलब्ध होऊन त्यांनी अतिशय उत्साहात भाषण केले. शेजारीच असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंह यांच्यासह सरकारमधील सहकारी मंत्री आणि खासदार बाके वाजवून उत्साह वाढवत होते. त्यातही मंत्री उमा भारती यांच्याकडून दर घोषणेगणिक दिली दाणारी "बहुत खूब'ची दाद लक्षवेधी होती. अखेरच्या अर्थसंकल्पातून नेमक्‍या कोणत्या चमकदार घोषणा होतील याची उत्सुकता असणाऱ्या भाजप खासदारांच्या चेहऱ्यावर सुरवातीला निराशा जाणवत होती. मात्र शेतकऱ्यांसाठीच्या आर्थिक मदत योजनेची घोषणा गोयल यांनी करताच भाजप खासदारांचे चेहरे चांगलेच खुलले.

दीड तासाहून अधिक काळ चाललेल्या भाषणादरम्यान गोयल यांनी तीन ग्लास पाणी संपविल्यामुळे विरोधी बाकांवरील शाब्दिक टिप्पण्यांनाही तोंड द्यावे लागले. मात्र त्याचा फारसा परिणाम गोयल यांच्यावर झाला नाही. हरियानातील जिंदच्या पोटनिवडणुकीच्या निकालाचा संदर्भ देत त्यांनी कॉंग्रेसला कोपरखळी लगावली. 

अंतिम अर्थसंकल्पासाठी विरोधी बाकांवरील उपस्थिती तुलनेने कमी दिसून आली. प्रारंभीच डाव्या पक्षाच्या खासदारांनी आर्थिक पाहणी अहवाल नसण्यावरून अर्थसंकल्प सादरीकरणालाच आक्षेप घेत गोंधळ घातला. मात्र, पीठासीन अधिकाऱ्यांनी अर्थमंत्र्यांना दिलेल्या आदेशानंतर डाव्या खासदारांनी नमते घेत शांतपणे भाषण ऐकणे पसंत केले. गोयल सुरवातीला मोदी सरकारच्या जुन्या योजनांची जंत्री मांडत असताना विरोधकांनी गोयल यांना राष्ट्रपती अभिभाषणाची पुनरावृत्ती केल्याचा चिमटा काढत शेरेबाजी सुरू केली. त्यातही तृणमूल कॉंग्रेसचे खासदार आघाडीवर होते. मात्र, नंतर अर्थमंत्र्यांकडून होणाऱ्या विविध योजनांच्या घोषणांनंतर विरोधी बाकांवर चांगलीच अस्वस्थता पसरली होती. तृणमूल कॉंग्रेसचे खासदार इद्रीस अली यांनी तर अर्थमंत्र्यांच्या घोषणा तद्दन खोट्या असून "झूट बोले कौआ काटे' अशी शेरेबाजीही केली. 

कॉंग्रेसच्या खासदारांनीही बसल्या जागेवरून टिप्पणी करत, तसेच वाढलेल्या बेरोजगारीबाबत वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचे मोठे फलक झळकावत अर्थमंत्र्यांच्या भाषणादरम्यान अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. खासदार राजीव सातव यांनी तर सत्ताधाऱ्यांच्या दिशेने जात या प्रती थेट अर्थमंत्री गोयल आणि पंतप्रधान मोदींकडे देऊन "याचाही विचार करा' असा सल्ला दिला. या वेळी राहुल गांधी शांत बसून होते. तृणमूल कॉंग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनीही दोन कोटी रोजगारांचे काय झाले, पंधरा लाख कधी मिळणार, नीरव मोदी कसा पळाला, अशी विचारणा करून सत्ताधाऱ्यांना डिवचले. परंतु, अर्थमंत्र्यांनी आपल्या घोषणांमधून विरोधकांचा "सर्जिकल स्ट्राइक' केल्याच्या घोषणा सत्ताधारी बाकांवरून दिल्या जात होत्या.

गोयल यांचे भाषण संपताच भाजप खासदारांनी बाके बडविताना "भारत माता की जय' आणि नंतर "मोदी मोदी...' अशा घोषणा सुरू केल्या होत्या. भाषण संपताच गोयल यांच्या अभिनंदनासाठी मंत्री आणि खासदारांची रांगच लागली होती. शेजारी बसलेल्या लालकृष्ण अडवानी, सुषमा स्वराज, नितीन गडकरी यांच्याकडून अभिनंदन स्वीकारणाऱ्या गोयल यांच्या आसनाजवळ पंतप्रधान मोदी यांनी स्वतः जाऊन पाठीवर शाबासकी देत अभिनंदन केले. 

कविता करू? : आठवले 

संसदेतील आपली उपस्थिती हरप्रकारे अधोरेखित करणारे रिपब्लिकन पक्षाचे नेते व सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आजही मागे राहिले नाहीत. गोयल आपल्या भाषणात घोषणांचा वर्षाव करत असताना आठवले यांनी राहुल गांधींना उद्देशून वारंवार "सुनो राहुलजी' असे म्हणत लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न चालविला होता. मात्र, भाषणाच्या अंतिम टप्प्यात गोयल यांनी महाराष्ट्रातील कवीच्या पंक्ती आपण सादर करणार आहोत, असे म्हणताच रामदास आठवले यांनी पुढे होत "मी कविता करू काय' असे विचारले. संसदेतील भाषणांमध्ये आठवलेंच्या चारोळ्या आधीच चर्चेचा विषय असताना ऐन अर्थसंकल्पी भाषणात त्यांनी दाखविलेला उत्साह सभागृहात चांगलाच हशा पिकवून गेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com