अलिगड विद्यापीठात इंटरनेटसेवा बंद ; विद्यार्थ्यांचा शिकवण्यांवर बहिष्कार 

पीटीआय
शनिवार, 5 मे 2018

अलिगड मुस्लिम विद्यापीठाने बॅ. जिना यांना आजीवन सदस्यत्व बहाल केले होते, जिना हे आमचे आदर्श नसले तरीसुद्धा ते भारतीय इतिहासाचा भाग आहेत. त्यामुळे त्यांचे तैलचित्र विद्यापीठामध्ये हवे, असे आम्हाला वाटते, असे विद्यापीठातील काही विद्यार्थी संघटनांना वाटते. हिंदू युवा वाहिनीने मात्र या भूमिकेला विरोध केला आहे.  

अलिगड: पाकिस्तानचे संस्थापक बॅ. मोहंमद अली जिना यांच्या तैलचित्रावरून निर्माण झालेला वाद आणखी चिघळण्याची शक्‍यता आहे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांनीच हे तैलचित्र हटविण्यास नकार देत शिकवण्यांवरदेखील बहिष्कार घातला आहे. विद्यापीठातील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने या परिसरातील इंटरनेटसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

विद्यापीठामध्ये दुपारी 2 ते मध्यरात्री बारापर्यंत इंटरनेट बंद राहणार असल्याचे जिल्हा न्यायदंडाधिकारी चंद्रभूषण सिंह यांनी सांगितले. अफवांना प्रतिबंध करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले. काही समाजकंटक इंटरनेटसेवेचा वापर करत चिथावणीखोर व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियामध्ये व्हायरल करू शकतात, ही बाब लक्षात घेऊन आम्ही इंटरनेटसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी नमूद केले. शुक्रवारच्या सामुदायिक प्रार्थनेनंतर विद्यार्थी आणि विद्यापीठातील प्राध्यापकांनी एकत्र येत आंदोलन केले. भाजपचे खासदार सतीश गौतम यांनी जिन्नांच्या तैलचित्राला आक्षेप घेत विद्यापीठ प्रशासनाला ते हटविण्यास सांगितले होते, यानंतरच खरा वाद निर्माण झाला होता. 

जिना हे इतिहासाचा भाग 

अलिगड मुस्लिम विद्यापीठाने बॅ. जिना यांना आजीवन सदस्यत्व बहाल केले होते, जिना हे आमचे आदर्श नसले तरीसुद्धा ते भारतीय इतिहासाचा भाग आहेत. त्यामुळे त्यांचे तैलचित्र विद्यापीठामध्ये हवे, असे आम्हाला वाटते, असे विद्यापीठातील काही विद्यार्थी संघटनांना वाटते. हिंदू युवा वाहिनीने मात्र या भूमिकेला विरोध केला आहे.  

Web Title: Internet ban on Aligad University Students Disoppointed