नीरव मोदीविरोधात "रेड कॉर्नर' नोटीस जारी 

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जुलै 2018

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केलेल्या विनंतीच्या आधारावर फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याच्याविरोधात इंटरपोलने "रेड कॉर्नर' नोटीस बजावली आहे. नीरवचा भाऊ निशाल मोदी आणि त्याचा कर्मचारी सुभाष परब यांच्याविरोधातही ही नोटीस जारी करण्यात आली आहे. पंजाब नॅशनल बॅंकेत दोन अब्ज डॉलरचा गैरव्यवहार केल्याचा नीरव मोदीवर आरोप आहे. 
 

नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केलेल्या विनंतीच्या आधारावर फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याच्याविरोधात इंटरपोलने "रेड कॉर्नर' नोटीस बजावली आहे. नीरवचा भाऊ निशाल मोदी आणि त्याचा कर्मचारी सुभाष परब यांच्याविरोधातही ही नोटीस जारी करण्यात आली आहे. पंजाब नॅशनल बॅंकेत दोन अब्ज डॉलरचा गैरव्यवहार केल्याचा नीरव मोदीवर आरोप आहे. 

"रेड कॉर्नर' नोटीस 29 जूनलाच बजावण्यात आली असून, त्याबाबतची माहिती आज जाहीर करण्यात आली. या नोटिशीमुळे नीरव मोदीच्या विदेशातील हालचालींवर बंधन येणार असून, त्याला अटक होण्याचीही शक्‍यता आहे. सीबीआयने मुंबईतील विशेष न्यायालयात नीरवविरोधात सादर केलेल्या आरोपपत्राच्या आणि त्याच्याविरोधात जारी केलेल्या अटक वॉरंटच्या आधारावर इंटरपोलने "रेड कॉर्नर' नोटीस बजावली आहे. नीरव मोदी तुमच्या देशात आढळल्यास त्याला ताब्यात घ्यावे, असे इंटरपोलने 192 देशांना या नोटिशीद्वारे कळविले आहे. त्याला ताब्यात घेतल्यानंतर हस्तांतराची प्रक्रिया सुरू केली जाईल, असेही यामध्ये म्हटले आहे. 

नीरव मोदी, त्याची पत्नी ऍमी मोदी, त्याचा अमेरिकी नागरिक असलेला भाऊ निशाल मोदी, बेल्जियमचा नागरिक असलेला मामा मेहुल चोक्‍सी या सर्वांवर सीबीआयने आरोप ठेवला आहे. हे सर्व जण "पीएनबी' गैरव्यवहार उघडकीस येण्याच्या काही आठवडे आधीच भारतातून फरार झाले आहेत. 

Web Title: Interpol issues red corner notice against Nirav Modi