रेल्वेच्या मेन्यूत 'केरळा फूड'ची एन्ट्री; कचोरी, छोले-भटुरेला देणार टशन?

वृत्तसंस्था
Wednesday, 22 January 2020

युन्नियप्पम/सुखिया/नेयप्पम 20 रुपयांना दोन असे मिळणार असल्याचे 'आयआरसीटीसी'ने जाहीर केले आहे.

कोची : रेल्वेच्या 'मेन्यू'तून गायब झालेले अप्पम, अंडाकरी, पुट्टु आणि कडाला करी हे खास केरळी पदार्थ पुन्हा उपलब्ध होणार आहेत. रेल्वेची खानपान सेवा पाहणारी 'आयआरसीटीसी' (इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन)ने मल्याळी पदार्थ यादीतून हद्दपार करीत त्या जागी कचोरी, छोले भटुरे अशा उत्तर भारतीय पदार्थांची वर्णी लावली होती. याला मोठा विरोध झाला होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सोशल मीडियावर 'आयआरसीटीसी'वर टीकेची झोड उठविण्यात आली. त्यामुळे आधीचा निर्णय रद्द करीत केरळी पदार्थ रेल्वेच्या यादीत पुन्हा दिसणार आहेत. अप्पम, पुट्टु आणि कडालासारख्या पदार्थांची चव चाखता येणार असल्याने केरळचे प्रवासी आनंदात आहेत. 

- मोठी बातमी - उद्धव ठाकरे जाणार अयोध्येला; राऊतांनी दिला 'चलो अयोध्या'चा नारा

रेल्वेच्या खानपान सेवेत दाक्षिणात्य पदार्थांऐवजी उत्तर भारतीय पदार्थांचा समावेश केल्याने केरळी समाजाची नाराजी एर्नाकुलमचे खासदार हिबी एडन यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना पत्राद्वारे कळविली. केरळच्या नागरिकांबाबत भेदभाव केल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

त्यानुसार 'युन्नियप्पम' आणि 'सुखिया' यासारख्या केरळच्या खास नाष्ट्याच्या पदार्थांसह अन्य पदार्थ राज्यातील 'आयआरसीटीसी'च्या केंद्रात उपलब्ध करणार असल्याचे आश्‍वासन त्यांना रेल्वेने दिले. 'आयआरसीटीसी'च्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी एडन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत अशा पदार्थांची यादीच सादर केली. 

- बेटावर देशाची स्थापना करणाऱ्या स्वामी नित्यानंदला इंटरपोलची नोटीस!

50 रुपयांत केरळी भोजन 

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना लिहिलेल्या पत्रात एडन यांनी पदार्थांच्या दरवाढीचाही उल्लेख केला आहे. जेवणाचा दर 35 वरून 70 रुपये करण्यात आला असून, वड्याची किंमत 8 रुपयांवरून 15 रुपये झाल्याचे एडन यांनी नमूद केले आहे.

- नेताजींच्या जयंतीनिमित्त सुटी जाहीर!

'आयआरसीटीसी'ने याची दखल घेतली असून पराठा, चपाती, इडियप्पम, अप्पम, पुट्टु व कडाला करी यांचा समावेश असलेले भोजन 50 रुपयांत उपलब्ध करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. वड्याची किंमत मात्र कमी केलेली नाही. युन्नियप्पम/सुखिया/नेयप्पम 20 रुपयांना दोन असे मिळणार असल्याचे 'आयआरसीटीसी'ने जाहीर केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IRCTC replacing Kerala dishes with north Indian fare in Railways menu