आयर्लंडचे मराठमोळे पंतप्रधान पोहोचले मालवणात; घेतली मूळगावाची भेट

विनोद दळवी
सोमवार, 30 डिसेंबर 2019

"आपले आडनाव असलेल्या गावात येऊन खूप समाधान वाटले', असे डॉ. वराडकर यांनी सांगितले.

ओरोस : मालवणी माणसाचे प्रेम आणि जिव्हाळा यांमुळे आज थेट आयर्लंडचे पंतप्रधान डॉ. लिओ वराडकर मूळ गाव असलेल्या वराडमध्ये दाखल झाले. त्यांनी गावच्या ग्रामदैवताचे दर्शन घेत गावकऱ्यांशी संवाद साधला. गावकऱ्यांनीही त्यांचे जल्लोषात स्वागत केले. "आपले आडनाव असलेल्या गावात येऊन खूप समाधान वाटले', असे डॉ. वराडकर यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Image may contain: 3 people, people smiling, people sitting

वराड हे मालवण तालुक्‍यातील इतर गावांसारखेच निसर्गसंपन्न गाव. आयर्लंडचे पंतप्रधान डॉ. लिओ यांच्यामुळे या गावाला विशेष ओळख मिळाली आहे. डॉ. वराडकर यांचे हे मूळ गाव. त्यांच्या वडिलांचा जन्म वराड गावात झाला. त्यांचे नाव अशोक असून ते नोकरीनिमित्त आयर्लंडला गेले. तेथेच त्यांनी विवाह केला व स्थायिक झाले. तेथे स्थायिक झाल्यानंतर वराडकर तीन वेळा वराड या गावी आले. येथून गेल्यानंतर ते नेहमी पंतप्रधान डॉ. लिओ यांना कोकण व गावाविषयी भरभरून सांगायचे. येथील निसर्ग सौंदर्य, पर्यटन याची महती ऐकून डॉ. लिओ यांनाही इकडे येण्याची इच्छा निर्माण झाली होती. ते आयर्लंडचे पर्यटनमंत्री झाले. त्यानंतर ते पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरले. हे समजताच वराड या गावातील ग्रामस्थांनी तेथील ग्रामदेवता श्री वेताळासमोर ते पंतप्रधान व्हावेत, असे साकडे घातले होते. ते पंतप्रधान झाले. त्यांनी वराडमधील कुटुंबीयांशी संवाद साधताना आपल्या गावी पूर्ण कुटुंबासह येईन, असे आवर्जून सांगितले होते. ही ओढ आणि वडिलांचा आग्रह यामुळे ते कोणताही शासकीय दौरा न लावता केवळ खासगी दौऱ्यावर वराडमध्ये दाखल झाले. त्यांच्यासोबत आई-वडील, दोन विवाहित बहिणी, भावोजी असे कुटुंब होते.

ठाकरे दरबाराचा आज महा"विस्तार' 

Image may contain: 13 people, people smiling, people standing

त्यांचे वराड येथील मूळ कुटुंबीयांनी घरगुती पद्धतीने स्वागत केले. यावेळी पंचायत समिती सदस्य विनोद आळवे, वसंत वराडकर, शेखर वराडकर, अविनाश वराडकर, पांडुरंग वराडकर, निखिल वराडकर, संतोष जामसंडेकर, प्रदीप मिठबावकर, राजन माणगावकर, दीपक भोगटे, आशिष हडकर, यतीन खोत आदी उपस्थित होते. येथे येऊन त्यांनी खास मालवणी पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेतला.

यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत "आपले आडनाव असलेल्या गावात येऊन समाधान वाटले', असे सांगितले. यावेळी त्यांनी आपल्या शेती-बागायतीला भेट दिली. दुपारच्या सत्रानंतर त्यांनी वराड गावचे ग्रामदैवत श्री देव वेताळाचे दर्शन घेतले. त्यानंतर येथील वराड हायस्कूलला त्यांनी भेट दिली. त्यानंतर कट्टा येथील चर्चला भेट दिली. तेथून ते मालवण येथे जायला गेले. त्यांच्यासमवेत त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. मालवण देवबागला एका खासगी हॉटेलमध्ये ते रात्री मुक्कामाला राहणार आहेत.

शिवसेनेचे ठरलं; ग्रामीण भागाला प्राधान्य आणि दर दोन वर्षांनी...

माझे आजोबा आणि वडील यांचे वराड गावाशी थेट नाते आहे. येथे येऊन खूप आनंद झाला. माझ्या पंतप्रधान पदासाठी पूर्ण वराड गावाने प्रार्थना केली होती. त्याबद्दल त्यांचा खूप आभारी आहे. येथील आमचे घर, जमीन जाऊन पाहिली. तेथील मासे, चिकन खाऊन तृप्तीचा ढेकर दिला.
- डॉ. लिओ वराडकर, पंतप्रधान, आयर्लंड.

ग्रामदैवतासमोर नतमस्तक
वराडचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव वेताळाच्या मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी डॉ. लिओ यांनी घंटा वाजवली. तेथे प्रथेप्रमाणे मालवणीत साकडे घालण्यात आले. यावेळी डॉ. लिओ यांच्यासह पूर्ण कुटुंब हात जोडून उभे होते.

वराड गाव जिल्ह्यातील प्रतिष्ठित गाव आहे. गावातील अनेकजण उदरनिर्वाहानिमित्त जगातील विविध देशांत वास्तव्यास आहेत. अनेकांनी विविध क्षेत्रांत आपले व पर्यायाने वराड गावचे नाव मोठे केले आहे. यांतील एक असलेल्या अशोक वराडकर यांचे पुत्र डॉ. लिओ यांनी आयर्लंडसारख्या देशात राजकीय यश मिळवत त्या देशाचे पंतप्रधान होण्याचा मान मिळविला आहे. हे आमच्या गावासाठी भूषणावह आहे.
- विनोद आळवे, वराड.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ireland Prime Minister Leo Varadkar Visits his home town in Malvan