कंदाहार अपहरणामागेच आयएसआयच: दोवाल

वृत्तसंस्था
रविवार, 15 जानेवारी 2017

भारतास या प्रवाशांच्या मुक्ततेसाठी मौलाना मसूद अझर, अहमद ओमर सईद शेख आणि मुश्‍ताक झरगर या तीन कुख्यात दहशतवाद्यांना मुक्त करावे लागले होते. या अपहरणकर्त्यांवर दबाव आणण्याचा भारताचा प्रयत्न आयएसआयने यशस्वी होऊ दिला नाही, असे दोवाल यांनी म्हटले आहे

नवी दिल्ली - इंडियन एअरलाईन्स या भारतीय विमान कंपनीच्या "आयसी-814' या विमानाच्या कंदाहार येथे करण्यात आलेल्या अपहरणास इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) या कुख्यात पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा पाठिंबा होता, असा गौप्यस्फोट भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी केला आहे.

दोवाल यांनी यावेळी भारताकडून दहशतवाद्यांशी केल्या जाणाऱ्या चर्चेमधील मुख्य अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली होती. नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडू येथून दिल्ली येथे जात असलेल्या विमानाचे पाच तालिबानी दहशतवाद्यांनी गेल्या 24 डिसेंबर, 1999 रोजी अपहरण केले होते. या दहशतवाद्यांना आयएसआयचा पाठिंबा नसता; तर भारतास ही समस्या सोडविण्यात यश आले असते, असे दोवाल यांनी म्हटले आहे.

"डिफीट इज ऍन ऑर्फन: हाऊ पाकिस्तान लूज दी ग्रेट एशियन वॉर,' या मायरा मॅकडोनाल्ड यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये दोवाल यांची यासंदर्भातील भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. मॅकडोनाल्ड या "रॉयटर्स' वृत्तसंस्थेच्या भारतीय शाखेच्या माजी प्रमुख आहेत. या विमानामध्ये एकूण 180 प्रवासी होते. भारतास या प्रवाशांच्या मुक्ततेसाठी मौलाना मसूद अझर, अहमद ओमर सईद शेख आणि मुश्‍ताक झरगर या तीन कुख्यात दहशतवाद्यांना मुक्त करावे लागले होते.

या अपहरणकर्त्यांवर दबाव आणण्याचा भारताचा प्रयत्न आयएसआयने यशस्वी होऊ दिला नाही, असे दोवाल यांनी म्हटले आहे.

Web Title: ISI backed Kandahar hijackers: Doval