इस्रो एका वेळी 83 उपग्रह सोडून करणार विश्वविक्रम

Indian Space Research Organisation
Indian Space Research Organisation

बंगळूर - एका वेळी 83 उपग्रह अवकाशात सोडून एक नवा विश्‍वविक्रम गाठण्यास भारतीय अवकाश संशोधन संघटना (इस्रो) सज्ज झाली आहे. पुढील वर्षात जानेवारी महिन्यात इस्रो तीन भारतीय व 80 परकी उपग्रह "पीएसएलव्ही-सी37' या प्रक्षेपकातून एकाच वेळी सोडणार आहे.

या महत्त्वाकांक्षी मोहिमेवर काम सुरू असून, जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही राबविली जाईल. याची तारीख अद्याप निश्‍चित केली नाही, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष ए. एस. किरण कुमार यांनी बुधवारी दिली.

या मोहिमेचा प्रारंभ गेल्या महिन्यात झाला. ""परकीय उपग्रहांचे प्रक्षेपण व्यावसायिक पातळीवर करण्यात येईल. इस्रोने अँट्रिक्‍स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीशी केलेल्या करारानुसार ही मोहीम राबविण्यात येईल,'' अशी माहिती जितेंद्र प्रसाद यांनी लोकसभेत दिली होती. यातील 80 उपग्रह इस्राईल, कझाकिस्तान, नेदरलॅंड्‌स, स्वित्झर्लंड व अमेरिका या देशांची आहेत. या सर्व उपग्रहांचे एकत्रित वजन 500 किलोग्रॅम आहे. "कॅटोसॅट -2' या भारतीय उपग्रहाचे वजन 730 ग्रॅम, तर "आयएनएस-आयए' व "आयएनएस-1बी' या उपग्रहांचे वजन 30 किलो आहे.

या वर्षी जून महिन्यात इस्रोने श्रीहरीकोटा येथून "पीएसएलव्ही-सी34' प्रक्षेपणातून 20 उपग्रह अवकाशात सोडले होते. ती इस्रोची उत्तम कामगिरी होती. 2008मध्ये दहा उपग्रह एकाच वेळी सोडण्यात आले होते. आतापर्यंत इस्रोने 50 परकी उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. आता एका वेळी 80 उपग्रह अवकाशात सोडून इस्रो नवा उच्चांक करणार आहे. तसेच भारतीय भूमीवरून सोडण्यात येणाऱ्या परकी उपग्रहांची शंभरी गाठणार आहे.
किरण कुमार म्हणाले, ""भारताच्या अवकाश संशोधनासाठी 2016 हे वर्ष अत्यंत लाभदायी ठरले. 2017 हे वर्ष त्यापेक्षा चांगले असेल, अशी आशा आहे. पुढील वर्षी किमान पाच दूरसंचार उपग्रह सोडण्यात येणार आहेत. पृथ्वीची निरीक्षणे करण्यासाठी त्यात जास्तीत जास्त उपकरणे असतील. तसेच जास्तीत जास्त उपग्रह वाहून नेण्यासाठी "जीएसएलव्ही मार्क 3 व मार्क 2' यांचे प्रक्षेपणही अनेक वेळा करण्यात येईल. नियोजनानुसार नवीन वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत तीन उड्डाणे होतील. यातील एक 83 उपग्रहांचे असेल.''

पुढील वर्ष इस्रोसाठी अत्यंत धावपळीचे ठरणार आहे. 48 ट्रान्सपॉंडरसह "जीसॅट-17', त्यानंतर 12 ट्रान्सपॉंडरच्या "सार्क' उपग्रह यांचे उड्डाण इस्रो करणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असलेले "जीसॅट-11' व "जीसॅट-19' ची मोहीम आहे. 14 गिगाबाइट व 90 गिगाबाइट क्षमतेचे "मल्टिबिम' उपग्रहावर काम करण्यात येणार आहे,'' असे किरण कुमार यांनी सांगितले.

दुसऱ्या चांद्रयान मोहिमेची चाचपणी
"मंगलयान' मोहीम व "जीएसएलव्ही'च्या यशामुळे आंतरराष्ट्रीय अवकाश क्षेत्रात इस्रोची प्रतिष्ठा वाढली आहे. उपग्रह सोडण्यासाठी अनेक देश इस्रोचे सहकार्य घेऊ लागले आहेत. एवढेच नाही तर भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी संयुक्तपणे काम करण्याची इच्छा अमेरिकेची अवकाश संशोधन संघटना "नासा'ने व्यक्त केली आहे. भारताच्या "चांद्रयान 2' मोहिमेबद्दल बोलताना किरण कुमार म्हणाले, की चंद्रावर सुरक्षितपणे यान उतरविण्यातील अडथळे दूर करण्यासाठी सध्या शास्त्रज्ञ चाचण्या घेत आहेत. चंद्रावर यान सुरक्षितपणे उतरणे अत्यंत महत्त्वाचे असते. तसे न झाल्यास संपूर्ण मोहीम उद्‌ध्वस्त होऊन कोट्यवधी डॉलरचे नुकसान होण्याची शक्‍यता असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com