भारताची अंतराळातून पृथ्वीवर नजर

भारताची अंतराळातून पृथ्वीवर नजर

श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आज पहाटे नवा इतिहास रचत "आरआयसॅट-2 बी' या पृथ्वीवर देखरेख ठेवणाऱ्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. ढगाळ वातावरणामध्येदेखील हा उपग्रह देखरेख ठेवू शकतो, त्यामुळे लष्करी आणि नागरी अशा दोन्हींसाठी त्याचा वापर करता येईल. पाकिस्तानच्या हद्दीतील सीमेलगतच्या दहशतवादी छावण्यांवरदेखील या उपग्रहाची नजर असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

"आरआयसॅट-2 बी' हा उपग्रह गुप्तहेरासारखा काम करेल. तो "आरआयसॅट-2'ची जागा घेईल. याआधी दहशतवादी छावण्यांवर देखरेख ठेवण्यासाठी या उपग्रहाचा वापर करण्यात आला होता. यामुळे दहशतवादी हल्ल्याचे अनेक कट उधळून लावण्यात भारताला यश आले होते. हा उपग्रह 2009 मध्ये प्रक्षेपित करण्यात आला होता. 

या नव्या उपग्रहामध्ये सिंथेटिक ऍपर्चर रडारचा वापर करण्यात आला असून, ते दिवसा आणि रात्री छायाचित्रे टिपू शकते. तसेच, ढगाळ परिस्थितीमध्येही ते काम करू शकते, असे "इस्रो'च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या उपग्रहाचा जीवनकाळ हा पाच वर्षांचा असून, तो लष्करी स्वरूपाच्या कामासाठीदेखील वापरता येऊ शकतो. तब्बल 25 तासांचे काउंटडाऊन संपुष्टात आल्यानंतर आज पहाटे ध्रुवीय प्रक्षेपकाच्या माध्यमातून सतीश धवन अंतराळ केंद्रावरून हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. 

देखरेख, कृषी, वन आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रामध्ये या उपग्रहाचा अधिक प्रभावरीतीने वापर केला जाऊ शकतो. प्रक्षेपणानंतर अवघ्या 15 मिनिटे 30 सेकंदांनी हा उपग्रह कक्षेमध्ये स्थिरावला. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या दृष्टीनेदेखील ही मोहीम अत्यंत महत्त्वपूर्ण होती. आतापर्यंत या प्रक्षेपकाच्या माध्यमातून पन्नास टन वजनांचे 354 उपग्रह अंतराळात सोडण्यात आले आहेत. यामध्ये काही राष्ट्रीय, शैक्षणिक कार्यासाठीचे आणि परकी उपग्रहांचाही समावेश आहे.

या वेळी "पीएसएलव्ही-सी 46' या प्रक्षेपकाच्या माध्यमातून देशांतर्गत विकसित प्रोसेर्स आणि कमी किमतीची दिशादर्शक यंत्रणा अवकाशात पाठविण्यात आली. या दोन उपकरणांमुळे प्रक्षेपणाच्या क्षेत्रामध्ये क्रांती होणार असल्याचे "इस्रो'चे अध्यक्ष के. सिवान यांनी सांगितले. याशिवाय 3.6 मीटरचा रिब अँटेनाही उपग्रहासोबत पाठविण्यात आला आहे. 

अवकाश भरारी 
25 
तासांचे काउंटडाऊन 
..... 
615 कि.ग्रॅ. 
उपग्रहाचे वजन 
....... 
48 वी 
"इस्रो'ची मोहीम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com