चंद्रावर होणार अंधार; विक्रमशी संपर्काची आशा दुरावली 

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

रात्रीकडे कलला 
'विक्रम' लॅंडरशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी आता "इस्रो'कडे फक्त तीन दिवस उरले आहेत. 20 किंवा 21 सप्टेंबर रोजी चंद्रावर रात्र होईल अन्‌ त्याचबरोबर "विक्रम'शी संपर्क साधण्याची आशाही मावळेल. चंद्राच्या ज्या भागात 'विक्रम' लॅंडर आदळले आहे, त्या भागात आता सूर्यप्रकाश पडणार नाही. तेथे तापमानात घट होऊन उणे 183 अंश सेल्सिअसपर्यंत पोचेल.

बंगळूर : भारतीय अंतराळ संशोधन संस्था 'इस्रो'च्या शास्त्रज्ञांकडून गेल्या 11 दिवसांपासून विक्रम लँडरशी संपर्क साधण्याची आशा दुरावली आहे, कारण आता चंद्राच्या दक्षिण भागावर अंधार होणार आहे.

भारताची महत्त्वाकांक्षी 'चांद्रयान 2' मोहीम अपयशी ठरली असली, तरी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरविण्याच्या भारताच्या प्रयत्नांचे देशभरातून कौतुक होत आहे. या मोहिमेसाठी पाठिंबा दिल्याबद्दलने मंगळवारी (ता. 17) ट्विट करून सर्वांचे आभार मानले. चंद्राच्या ज्या भागात आतापर्यंत कोणताच देश पोचला नाही, अशा दक्षिण ध्रुवावर यान उतरविण्याची महत्त्वाकांक्षी योजना 'इस्रो'ने "चांद्रयान 2'द्वारे राबविली होती. रशियाकडून अपेक्षित मदत न मिळाल्याने देशातच यान व त्यातील लॅंडर आणि रोव्हरची बांधणी करण्याचे आव्हान पूर्ण करीत गेल्या महिन्यात 'चांद्रयान 2' चंद्राकडे झेपावले. 

7 सप्टेंबरला यानापासून वेगळा झालेला 'विक्रम' लँडर चंद्रावर उतरण्याचा शेवटचा, पण या मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा होता. मात्र, लँडर चंद्रापासून 2.1 किलोमीटरवर असतानाचा त्याचा संपर्क तुटला. त्यानंतर 11 दिवस "विक्रम' लॅंडरशी संपर्क साधण्याचा अथक प्रयत्न "इस्त्रो' करीत आहे. मात्र आता चंद्राचा दक्षिण भाग सूर्यप्रकाशापासून दूर जात असून, तेथे तीन-चार दिवसांतच अंधार होणार असल्याने "विक्रम'शी संपर्क साधण्याची आशा दुरावली आहे. 'चांद्रयान 2' ला 100 टक्के यश मिळाले नसले तरी भारताने चांद्रयान मोहिमेत मोठा पल्ला गाठला आहे. जगभरातील भारतीयांच्या आशा-आकांक्षा आणि स्वप्नांच्या बळावर आम्ही सतत पुढे जात राहू. "इस्रो'च्या पोस्टमध्ये एक छायाचित्रही शेअर केले आहे. यात चंद्राच्या समोर उभी असलेली एक व्यक्ती एका कड्यावरून दुसऱ्या कड्यावर उडी मारत असल्याचे दिसत आहे. 

रात्रीकडे कलला 
'विक्रम' लॅंडरशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी आता "इस्रो'कडे फक्त तीन दिवस उरले आहेत. 20 किंवा 21 सप्टेंबर रोजी चंद्रावर रात्र होईल अन्‌ त्याचबरोबर "विक्रम'शी संपर्क साधण्याची आशाही मावळेल. चंद्राच्या ज्या भागात 'विक्रम' लॅंडर आदळले आहे, त्या भागात आता सूर्यप्रकाश पडणार नाही. तेथे तापमानात घट होऊन उणे 183 अंश सेल्सिअसपर्यंत पोचेल. अशा तापमानात लॅंडरमधील इलेक्‍ट्रॉनिक भाग चालू स्थितीत राहण्याची शक्‍यता नाही. 'विक्रम' लॅंडरमध्ये "रेडिओ आयसोटेप हीटर'ची सोय नसल्याने त्याच्याशी संपर्क साधता येणार नाही. चंद्रावर उतरल्यानंतर 14 दिवस सूर्यप्रकाशात "विक्रम' लॅंडर आणि प्रज्ञान रोव्हर तेथील माहिती गोळा करण्याचे काम करणार होते. मात्र, या मोहिमेचा कार्यकाळ पूर्ण होत आला आहे. चंद्रावर आता सायंकाळास सुरवात झाली असून उद्या किंवा परवा तेथे अंधार पसरेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ISRO still searching for India's Chandrayaan-2 Vikram moon lander