वैद्यकीय व्यवसायासाठी आता "नेक्‍स्ट' 

सकाळ न्यूज नेटवर्क 
मंगळवार, 30 जुलै 2019

नव्या विधेयकानुसार... 
- वैद्यकीय शिक्षणासाठी फक्त "नीट' ही एकमेव प्रवेश परीक्षा. 
- राष्ट्रीय वैद्यकीय आयोगामध्ये चार स्वायत्त मंडळे. 
- "एमबीबीएस'ची शेवटच्या वर्षाची परीक्षा "नॅशनल एक्‍झिट टेस्ट' (नेक्‍स्ट). 
- वैद्यकीय व्यवसायाच्या परवान्यासाठी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीची "नेक्‍स्ट' ही प्रवेश परीक्षा. 
- परदेशातील वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांसाठीही ही परीक्षा आवश्‍यक.

नवी दिल्ली -  महत्त्वाकांक्षी "राष्ट्रीय वैद्यकीय आयोग' विधेयक लोकसभेने आज मंजूर केले. भारतातील वैद्यकीय शिक्षण व्यवस्था जागतिक दर्जाची बनविण्याच्या उद्देशाने हे विधेयक आणल्याचा दावा आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केला.

राज्यसभेनेही यावर शिक्कामोर्तब केल्यास वैद्यकीय शिक्षणाठी यापुढे फक्त "नीट' ही एकच प्रवेश परीक्षा असेल. शिवाय वैद्यकीय व्यवसायासाठीही "नॅशनल एक्‍झिट टेस्ट' (नेक्‍स्ट) ही प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक असेल. 

मंत्रिमंडळाने दोन आठवड्यांपूर्वी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (नॅशनल मेडिकल कमिशन) स्थापन करण्यासाठीच्या विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली दिली होती. आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी हे विधेयक मंजुरीसाठी मांडल्यानंतर कॉंग्रेस, द्रमुक, तृणमूल कॉंग्रेस या पक्षांनी विरोध दर्शविताना या विधेयकाची छाननी होण्याची आवश्‍यकता बोलून दाखविली होती. या विधेयकाला डॉक्‍टरांनी तीव्र विरोध व्यक्त केला आहे. एखाद्या विद्यार्थ्याला "नेक्‍स्ट' परीक्षा देता न आल्यास त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही. विधेयकामध्ये दुसऱ्या पर्यायाचा उल्लेख नसल्याचेही डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. विरोधकांनी याकडेही सरकारचे लक्ष वेधले. 

विधेयकावर झालेल्या चर्चेच्या उत्तरात डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले, की विद्यमान राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेची व्यवस्था संपुष्टात येईल आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोग परिषदेची जागा घेईल. या आयोगाला खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रिया त्याचप्रमाणे 50 टक्के जागांच्या शुल्क नियंत्रणाचे अधिकार आयोगाला असतील. वैद्यकीय व्यावसायिकांना आपल्या क्षेत्रातील संशोधनाला आयोग प्रोत्साहन देईल. त्याचप्रमाणे वैद्यकीय महाविद्यालयांचे मूल्यांकनही आयोगातर्फे केले जाईल. याअंतर्गत केंद्र सरकारला सल्लागार परिषद बनविण्याचे अधिकार मिळणार असून, या व्यासपीठावर राज्यांना आपल्या अडचणी मांडण्याची संधी मिळेल. 

नव्या विधेयकानुसार... 
- वैद्यकीय शिक्षणासाठी फक्त "नीट' ही एकमेव प्रवेश परीक्षा. 
- राष्ट्रीय वैद्यकीय आयोगामध्ये चार स्वायत्त मंडळे. 
- "एमबीबीएस'ची शेवटच्या वर्षाची परीक्षा "नॅशनल एक्‍झिट टेस्ट' (नेक्‍स्ट). 
- वैद्यकीय व्यवसायाच्या परवान्यासाठी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीची "नेक्‍स्ट' ही प्रवेश परीक्षा. 
- परदेशातील वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांसाठीही ही परीक्षा आवश्‍यक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: it is mandatory to take the National Exam Test For the Medical Business