...तर दहशतवादी तयार होतील : राहुल गांधी 

पीटीआय
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

हॅम्बुर्ग (जर्मनी) (पीटीआय) : एखाद्या मोठ्या समुदायाला विकासप्रक्रियेपासून दूर ठेवल्यास दहशतवादी गट तयार होऊ शकतात, 'इसिस'ची निर्मितीही अशीच झाली, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले. भारतातही भाजप सरकार दलित, अल्पसंख्य आणि आदिवासी समुदायांना विकासापासून दूर ठेवत आहे, असा आरोपही त्यांनी केला. 

हॅम्बुर्ग (जर्मनी) (पीटीआय) : एखाद्या मोठ्या समुदायाला विकासप्रक्रियेपासून दूर ठेवल्यास दहशतवादी गट तयार होऊ शकतात, 'इसिस'ची निर्मितीही अशीच झाली, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले. भारतातही भाजप सरकार दलित, अल्पसंख्य आणि आदिवासी समुदायांना विकासापासून दूर ठेवत आहे, असा आरोपही त्यांनी केला. 

जर्मनीच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी आज येथील नागरिकांशी संवाद साधला. लोकांना विकासाच्या प्रक्रियेतून बाजूला केले, तर "इसिस'च्या निर्मितीस कारणीभूत ठरली तशीच परिस्थिती भारतात निर्माण होईल, असा इशारा राहुल यांनी दिला. "एकविसाव्या शतकातही विकासप्रक्रियेतून लोकांना वगळणे धोकादायक आहे. तुम्ही त्यांना दिशादर्शन केले नाही, तर दुसरे कोणी तरी करेल,' असे राहुल म्हणाले. भाजप सरकारने आदिवासी, दलित आणि अल्पसंख्यांकांना विकासापासून दूर ठेवल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला. जागतिक बदलांनुसार काही समाजांना संरक्षण देण्याची गरज असताना भारत सरकार मात्र नोटाबंदी, जीएसटी यांसारखे निर्णय घेऊन त्यांचे संरक्षण काढून घेत आहे आणि त्यामुळेच जमावाकडून हत्या होण्यासारखे प्रकार घडत आहेत, असे राहुल म्हणाले. बेरोजगारांच्या मनातही सरकारविरोधात राग असल्याचा दावा त्यांनी केला. 

राहुल म्हणाले... 
- दलित, आदिवासी, मागासवर्गीय यांना काही निवडक लोकांसारखे फायदे मिळू नयेत, असेच भाजपला वाटते. 
- अल्पसंख्याकांच्या आधारावरच भाजपचे हल्ले 
- नोटाबंदीमुळे लघुउद्योजकांचे मोठे नुकसान झाले 
- जीएसटी अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने 

राहुल यांच्याकडून दिशाभूल 
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जर्मनी दौऱ्यात भारताचे महत्त्व कमी केल्याची टीका भाजपने केली आहे. राहुल यांनी दहशतवादाचे समर्थन केले असून, मोदी सरकारवर टीका करण्यासाठी खोटेपणाचा आधार घेतल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला. महिला अत्याचारांचा मुद्दा चुकीच्या पद्धतीने मांडून राहुल यांनी भारताची बदनामी केल्याने काँग्रेसने याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही पात्रा यांनी केली. 
"राहुल यांनी भारताला कमी लेखण्याची एकही संधी सोडली नाही. त्यांनी दहशतवादाचेही समर्थन केले. यासारखे भयानक काही नाही. भारतातील अल्पसंख्य समाजाला नोकऱ्या मिळाल्या नाहीत, तर ते दहशतवादी बनू शकतात, असा राहुल यांनी केलेला इशारा म्हणजे अल्पसंख्य समुदायाचा अवमान करण्यासारखेच आहे. राहुल यांचे भारताबाबतचे आकलन अत्यंत खराब असून, त्यांचे भाषण म्हणजे खोटेपणाचा नमुना आहे,' असा आरोप पात्रा यांनी केला. 

Web Title: It will happen create for terrorists: Rahul Gandhi