भारतीय जवानांच्या शौर्याचा व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 जुलै 2019

भारतीय जवानांच्या शौर्य जगजाहिर आहे. जवानांच्या शौर्याचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जवानांनी भाविकांच्या संरक्षणासाठी छातीची ढाल केली आहे.

श्रीनगर: भारतीय जवानांच्या शौर्य जगजाहिर आहे. जवानांच्या शौर्याचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जवानांनी भाविकांच्या संरक्षणासाठी छातीची ढाल केली आहे. अमरनाथ यात्रा सुरू झाली असून, या यात्रेदरम्यान भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो. डोंगर, दऱ्यांमधून वाट काढत भाविकांना मार्गक्रमण करावे लागतं. या काळात भारतीय जवान कायम भाविकांच्या मदतीला धावून जातात. याचा प्रत्यय देणारा हा व्हिडीओ आहे.

अमरनाथ यात्रेकरुंच्या सुरक्षेसाठी छातीचा कोट करणाऱ्या इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. डोंगरावरुन कोसळणाऱ्या दगडांपासून यात्रेकरुंचा बचाव करण्यासाठी आयटीबीपीचे जवान अगदी स्वत:ची ढाल करुन उभे असल्याचे या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. यात्रेकरुंचा प्रवास सुकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी आयटीबीपीचे अथक प्रयत्न सुरू आहेत. यासोबतच आयटीबीपीकडून यात्रेकरुंना वैद्यकीय मदतदेखील दिली जात आहे. अमरनाथ गुहेपासून काही अंतरावर असणाऱ्या बालताल परिसरातील हा व्हिडिओ आहे. यामध्ये पर्वतावरून घरंगळत येणाऱ्या दगडांमुळे अमरनाथ यात्रेकरूंना इजा होऊ नये, यासाठी आयटीबीपीच्या जवानांनी स्वत:ची ढाल केल्याचे दिसत आहे. हिमालयातील अत्यंत तीव्र उतारावून वेगाने खाली येणाऱ्या या दगडांमुळे यात्रेकरूंना मोठा धोका असतो. मात्र, आयटीबीपीचे जवान जीवावर उदार होऊन त्यांच्याकडील ढालीच्या सहाय्याने हे दगड अडवताना दिसत आहेत.

दरम्यान, 1 जुलैपासून अमरनाथ यात्रेला प्रारंभ झाला असून, येत्या 15 ऑगस्टपर्यंत ही यात्रा सुरु असेल. समुद्रसपाटीपासून 3,888 मीटर उंचीवर असलेली अमरनाथची गुहा हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममधून 36 किलोमीटर आणि बलटाल भागातील 14 किलोमीटरच्या मार्गावरून ही यात्रा जाते. या खडतर प्रवासात आयटीबीपीचे जवान यात्रेकरूंना ऑक्सिजन पुरवण्यापासून अनेक ठिकाणी मदत करतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ITBP personnel braving shooting stones by placing Shield wall to ensure safe passage of Amarnath Yatris