जगनमोहन रेड्डी यांनी घेतली आंध्रच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 मे 2019

लोकसभेबरोबरच झालेल्या येथील विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसने 175 पैकी 151 जागांवर विजय मिळवत सत्ताधारी तेलुगू देसमची धुळधाण उडविली. आज झालेल्या शपथविधी कार्यक्रमात त्यांनी शपथ घेतली.

विजयवाडा : आंध्र विधानसभेत प्रचंड बहुमत मिळालेल्या वायएसआर कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांची आज (गुरुवार) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल ई. एस. एल. नरसिंहम यांनी त्यांना शपथ दिली.

लोकसभेबरोबरच झालेल्या येथील विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसने 175 पैकी 151 जागांवर विजय मिळवत सत्ताधारी तेलुगू देसमची धुळधाण उडविली. आज झालेल्या शपथविधी कार्यक्रमात त्यांनी शपथ घेतली.

जगनमोहन रेड्डी यांची एकमताने विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली होती. पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नेतेपदी निवड झाल्याबद्दल आभार मानताना जगनमोहन म्हणाले, की जनतेने यंदा आपल्यावर विश्‍वास ठेवून निवडून दिले आहे, पुढील निवडणुकीत आपल्या कामाच्या जोरावर विजय मिळवायचा आहे.

लोकसभा निवडणुकीत देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएने बंपर विजय मिळवलेला असताना, आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसच्या लाटेत चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीची वाताहत झाली आहे. जगमोहन रेड्डी यांनी ६९ वर्षीय टेक्‍नोसॅव्ही मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपीला जबरदस्त दणका दिला आहे. बहुमतासाठी १७५ पैकी ८८ जागा हव्या असताना वायएसआर यांच्या खात्यात दीडशेहून अधिक जागा गेल्या आहेत. आंध्र प्रदेशच्या १७५ विधानसभा जागांसाठी पहिल्या टप्प्यात ११ एप्रिल रोजी मतदान झाले होते. 

जगनमोहन रेड्डी हे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते वायएसआर राजशेखर रेड्डी यांचे चिरंजीव होत. २ सप्टेंबर २००९ मध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत राजशेखर रेड्डी यांचा मृत्यू झाला. त्या वेळी काँग्रेस हायकमांडने जगमोहन रेड्डींकडे सूत्रे दिली नाहीत. त्यामुळे त्यांनी काँग्रेसपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. १२ मार्च २०११ रोजी त्यांनी वायएसआर काँग्रेसची स्थापना केली. २०१४ मध्ये त्यांनी पहिली निवडणूक लढली आणि ६७ जागा जिंकल्या. २०१९ च्या विधानसभेतील विजय हा जगनमोहन रेड्डी यांचे स्वप्न पूर्ण करणारा ठरला. सुमारे ८ वर्षांनंतर जगनमोहन रेड्डी यांचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: JaganMohan Reddy Sworn In As Andhra Pradesh Chief Minister KCR Stalin Attend