जगदीश टायटलर यांचा पॉलिग्राफ टेस्टला नकार

पीटीआय
मंगळवार, 23 मे 2017

शीखविरोधी दंगल प्रकरण; 2 जूनला पुढील सुनावणी

या प्रकरणातील मुख्य साक्षीदार व शस्त्र विक्रेता अभिषेक वर्मा यांच्या वकिलाने आपल्या अशिलाची प्रकृती ठीक नसल्याचे न्यायालयासमोर सांगितले. न्यायालयाने त्यांना उपस्थित राहण्यासाठी आणखी कालावधी द्यावा, अशी मागणीही वर्मा यांच्या वकिलाने केली आहे.

नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते जगदीश टायटलर यांनी आज 1984 मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलीशी संबंधित एका प्रकरणी सत्यशोधन चाचणी (पॉलिग्राफ) देण्यास नकार दर्शवला. या प्रकरणातील तीन प्रसंगांसाठी सीबीआयने त्यांना नुकतीच क्‍लीन चिट दिली होती.

सीबीआयने जगदीश यांची पॉलिग्राफ चाचणी घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार, जगदीश यांनी महानगर दंडाधिकारी शिवाली शर्मा यांच्यासमोर एक प्रतिज्ञापत्र सादर केले असून, त्यात ही चाचणी देण्यास आपली सहमती नसल्याचे नमूद आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य साक्षीदार व शस्त्र विक्रेता अभिषेक वर्मा यांच्या वकिलाने आपल्या अशिलाची प्रकृती ठीक नसल्याचे न्यायालयासमोर सांगितले. न्यायालयाने त्यांना उपस्थित राहण्यासाठी आणखी कालावधी द्यावा, अशी मागणीही वर्मा यांच्या वकिलाने केली आहे.

न्यायालयाने वर्मा यांना तशी परवानगी देतानाच या प्रकरणाची सुनावणी 2 जूनपर्यंत पुढे ढकलली. दरम्यान, टायटलर व वर्मा यांनी पॉलिग्राफ चाचणीसंबंधी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशा सूचना न्यायालयाने 9 मे रोजी केल्या होत्या. यासाठी त्यांच्या काही अटी असतील, तर त्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे, असेही न्यायालयाने म्हटले होते.

काय आहे प्रकरण
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर 1 नोव्हेंबर 1984 रोजी दिल्लीतील पूल बंगाश गुरुद्वारा येथे दंगलीदरम्यान तीन व्यक्तींची हत्या झाली होती. या प्रकरणात आपली कोणतीही भूमिका नसल्याचा दावा टायटलर करत आहेत.

Web Title: jagdish tytler refuses to undergo polygraph test