मोदी भविष्याकडे तर राहुल गोंधळाकडे!

पीटीआय
सोमवार, 9 जानेवारी 2017

राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील फरक स्पष्ट दिसत आहे. पंतप्रधान पुढील पिढ्यांचा विचार करीत आहेत. याचवेळी राहुल मात्र, संसदेचे पुढील अधिवेशन कसे बंद पाडता येईल याचा विचार करीत आहेत.

 

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी भविष्यातील तंत्रज्ञानाधारित स्वच्छ अर्थव्यवस्थेकडे पावले टाकत असताना राहुल गांधी संसदेच्या कामकाजात अडथळा आणत आहेत. कॉंग्रेस पक्ष काळ्या पैसेवाल्यांच्या हिताची भूमिका घेत आहे, अशी टीका केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी केली.

कॉंग्रेसने नोटाबंदीला केलेल्या विरोधाचा जेटली यांनी फेसबुकवरील "नोटाबंदी : मागील दोन महिन्यांकडे वळून पाहताना' या पोस्टद्वारे आज समाचार घेतला. ते म्हणतात, ""राष्ट्रीय पक्ष असूनही कॉंग्रेसने घेतलेली भूमिका ही तंत्रज्ञान, बदल आणि सुधारणांना विरोध करणारी आहे. कॉंग्रेसने अर्थव्यवस्थेची घडी विस्कटल्याचा केलेला दावा फोल ठरला आहे. पंतप्रधान आणि विरोधकांच्या भूमिकेत फार मोठा फरक आहे. पंतप्रधान भविष्याचा विचार करीत आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करीत आहेत. आता त्यांनी राजकीय पक्षांना मिळणाऱ्या पैशांना मिळणारा निधीचा स्रोत स्वच्छ करण्याची भूमिका घेतली आहे. त्यांचे विरोधक हे रोख पैशांना महत्त्व देणारे आणि आहे त्याच स्थितीत कायम राहणारे आहेत.''

""नोटाबंदीसारख्या मोठ्या निर्णयाची अंमलबजावणी करताना देशात कोणतीही सामाजिक अशांतता निर्माण झाली नाही. प्रसारमाध्यमांनी घेतलेल्या जनमत चाचण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांना सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. विरोधकांनी संसदेचे पूर्ण अधिवेशन गोंधळात वाया घालविले. त्यांचा विरोध निष्प्रभ ठरला. त्यांनी अर्थव्यवस्थेमध्ये घसरण होण्याचे केलेले दावे खोटे ठरले. नोटाबंदीनंतर अप्रत्यक्ष करांच्या संकलनात नोव्हेंबरमध्ये 23.1 टक्के वाढ होऊन ते 67,358 कोटी रुपयांवर पोचले आहे.'

Web Title: Jaitley slams Rahul Gandhi