'जलिकट्टू' दंगलीत दोन ठार; 129 जखमी

वृत्तसंस्था
रविवार, 22 जानेवारी 2017

चेन्नईला रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम म्हणाले, की जलिकट्टूवरील बंदी पूर्णपणे हटविली आहे. लवकरच तमिळनाडू विधानसभेत जलिकट्टूबाबत कायमस्वरूपी कायद्याचा मसुदा आणू. आलंगनल्लूर येथे स्थानिक नागरिकांनी तारीख निश्‍चित केल्यानंतर खेळाचे आयोजन केले जाईल, असेही त्यांनी नमूद केले. 

चेन्नई/मदुराई : तमिळनाडूत जलिकट्टूवरून निर्माण झालेला तणाव अजूनही निवळण्याची चिन्हे दिसत नाहीत. शनिवारी अध्यादेश काढल्यानंतर राज्यात जलिकट्टूचा धुराळा उडत असतानाच तीव्र विरोधामुळे मुख्यमंत्र्यांना उद्‌घाटन न करताच चेन्नईला परतावे लागले. मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी काल आलंगनल्लूर येथे जलिकट्टूचे उद्‌घाटन करणार असल्याचे जाहीर केले होते; मात्र राज्यात जलिकट्टू आयोजन करण्यासंदर्भात कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांची होती. राज्यात आज सर्वत्र जलिकट्टूची दंगल होत असताना पुडुकोट्टई येथे खेळादरम्यान दोघांच्या मृत्यूने गालबोट लागले. तसेच 129 जण जखमी झाल्याची घटना घडली.

तमिळनाडूचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शनिवारी जलिकट्टूसंबंधी अध्यादेशाला मंजुरी दिल्यानंतर आज मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्या हस्ते मदुराई येथे खेळाचे उद्‌घाटन करण्यात येणार होते; परंतु आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांना मैदानावर जाता आले नाही. त्यांना हॉटेलमध्येच थांबावे लागले. मदुराई, रामेश्‍वरसहित अनेक ठिकाणी जलिकट्टूबाबत कायमस्वरूपी तोडगा काढावा, यावरून आंदोलन केले. पनीरसेल्वम यांनी नागरिकांना आंदोलन थांबविण्याचे आवाहन केले होते. तरीही आवाहनाला न जुमानता राज्यातील अनेक भागांत तीव्र आंदोलन सुरूच ठेवले. अनेक ठिकाणी रस्ते बंद करण्यात आले, तर काहींनी धरणे आंदोलन सुरू केले. त्यामुळे रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला.

जलिकट्टूसाठी काही भागांत रेल्वेने विशेष गाड्यांची सोय केली होती. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली; परंतु मदुराई आणि तमुक्कम मैदानात आंदोलन सुरू राहिल्याने पनीरसेल्वम यांच्या जलिकट्टू उद्‌घाटनावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले होते. राज्यात तणावाच्या वातावरणात जलिकट्टूचे आयोजन होत असताना पुडुकोट्टई येथील दोघांच्या मृत्यूमुळे गालबोट लागले. जलिकट्टूखेळाच्या वेळी दोघांचा मृत्यू झाला, तर 129 जण जखमी झाले. त्याचबरोबर आंदोलन करणाऱ्या एका नागरिकाचा अतिसारामुळे मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. जखमी झालेल्या नागरिकांना प्रथमोपचार करून सोडण्यात आले. तिरुनेवेली येथे आंदोलनात काही विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला होता.

Web Title: jallikattu takes two lives, 129 injured