तोंडी तलाकच्या चर्चासत्रातून नाव वगळण्यासाठी दबाव: शाझिया इल्मी

वृत्तसंस्था
बुधवार, 1 मार्च 2017

नवी दिल्ली: "तोंडी तलाक'च्या मुद्यावर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रातील वक्‍त्यांच्या यादीतून आपले नाव वगळण्यासाठी जामिया विद्यापीठाने आयोजकांवर दबाव आणल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या नेत्या शाझिया इल्मी यांनी आज येथे केला.

नवी दिल्ली: "तोंडी तलाक'च्या मुद्यावर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रातील वक्‍त्यांच्या यादीतून आपले नाव वगळण्यासाठी जामिया विद्यापीठाने आयोजकांवर दबाव आणल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या नेत्या शाझिया इल्मी यांनी आज येथे केला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या राष्ट्रीय सुरक्षा जागरूकता फोरमने "तोंडी तलाक' या विषयावर आयोजित चर्चासत्रात आपल्याला बोलविले होते. मात्र, विद्यापीठाने आयोजकांवर "मुस्लिम महिलांचे सबलीकरण : समस्या आणि आव्हान' हा विषय बदलण्यास आणि वक्‍त्यांच्या यादीतून आपले नाव वगळण्यासाठी दबाव आणला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराचे असणाऱ्या इंद्रेशकुमार यांचा हा मंच आहे. जामिया मिला इस्लामियाच्या अधिकाऱ्यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत, असे त्या म्हणाल्या. हा कार्यक्रम विद्यापीठाने किंवा त्यांच्या कुठल्याही विभागाने आयोजित केलेला नाही. विद्यापीठाचे सभागृह हे भाडेतत्त्वावर आयोजकांनी घेतले होते, त्यामुळे विषय किंवा वक्‍त्यांचा विद्यापीठाशी कोणताही संबंध नाही. तो आमचा विशेषाधिकारही नाही, त्यामुळे आम्ही आयोजकांवर कोणताही दबाव आणलेला नाही, असे जामियाच्या प्रवक्‍त्याने स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे संयोजक शैलेश वस्त म्हणाले की, आम्ही विषयांची आणि वक्‍त्यांची यादी अंतिम केली होती. मात्र, विद्यापीठाचे वातावरण अशा प्रकारच्या चर्चांसाठी अनुकूल नसल्याचे सांगत काही बदल करण्यास सांगितले.

Web Title: Jamia University dropped my name from speaker's list: Shazia Ilmi