
GK Reddy : जम्मू-काश्मीर भारताचाच भाग; केंद्रीय पर्यटन मंत्री जी. के. रेड्डी यांचे पाकला प्रत्युत्तर
श्रीनगर - जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि पाकिस्तानला याबाबत बोलण्याचा कोणताही अधिकार नाही असा प्रतिपादन केंद्रीय पर्यटन मंत्री जी. के. रेड्डी यांनी केले. पाकिस्तानने आपल्या देशात काय चालू आहे हे पहावे असा टोलाही रेड्डी यांनी लगावला.
श्रीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या जी-२० देशांच्या पर्यटन विभागाच्या कार्यकारी गटाच्या बैठकीसाठी श्रीनगर येथे आलेल्या जी. के. रेड्डी यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रेड्डी म्हणाले की, ‘जे देशवासीयांच्या हिताचे आहे ते सर्व आम्ही करू. या मध्ये ढवळाढवळ करणारा पाकिस्तान कोण आहे? त्या देशाला आमच्या देशात ढवळाढवळ करण्याचा अधिकार कोणी दिला?
जम्मू-काश्मीर हा अगदी स्वातंत्र्यापासूनच भारताचा अविभाज्य भाग आहे.’ जम्मू-काश्मीरच्या संरक्षणासाठी अनेक भारतीयांना हौतात्म्य पत्करल्याचा उल्लेख देखील त्यांनी यावेळी केला. ‘पाकिस्तान सरकारने आपल्या देशात काय चालू आहे ते पाहावे, आणि त्यांच्या देशातील लोकांच्या विकासासाठी काहीतरी करावे; तिथे भुकेने लोक मरत आहेत, त्यांना अन्नपाणी मिळत नाहीये, पाकिस्तानने यावर लक्ष केंद्रित करावे’ असा उपरोधिक सल्ला देखील त्यांनी यावेळी पाकिस्तानला दिला.
त्यामुळे पाकिस्तान जम्मू-काश्मीरबाबत काय बोलत आहे त्याला काहीही किंमत देण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, जम्मू-काश्मीरसह देशांतील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी आणि येथे गुंतवणूक आणण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.