जम्मूत ग्रेनेड फेकण्यासाठी दिले होते 50 हजार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 8 मार्च 2019

आरोपीने युट्यूबच्या सहाय्याने ग्रेनेड हल्ला कसा करायचा याचे प्रशिक्षण घेतले होते. हल्ला झाल्यानंतर एका तासात आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले.

श्रीनगरः जम्मू बस स्थानकामध्ये ग्रेनेड फेकण्यासाठी दहशतवादी संघटनेने 50 हजार रुपये दिले होते, अशी माहिती संशयित आरोपीने चौकशीदरम्यान दिली. गुरुवारी (ता. 7) झालेल्या या स्फोटात दोघांचा मृत्यू तर 30 जण जखमी झाले होते. जखमींपैकी 11 जण काश्‍मीरचे असून, दोन बिहारचे व छत्तीसगड व हरियानातील प्रत्येकी एक जण आहे.

बस स्थानकात ग्रेनेड फेकणारा आरोपी कुलगाम जिल्ह्यातील आहे. स्फोट झाल्यानंतर काही वेळातच त्याला नाग रोटा येथील टोल प्लाझावरुन अटक करण्यात आली. या ग्रेनेड स्फोटामागे हिजबुल मुजाहिद्दीनचा हात आहे. त्यांनी आरोपीला ग्रेनेड फेकण्यासाठी 50 हजार रुपये दिले. स्फोटानंतर तो काश्मीर खोऱ्यात निसटण्याचा प्रयत्न करत होता. आरोपी अल्पवयीन असून हिजबुलचा म्होरक्या फय्याझ भट यानेच मुलावर हल्ल्याची जबाबदारी सोपवली होती. आज (शुक्रवार) संध्याकाळी आरोपीने चौकशीदरम्यान ही माहिती दिली.

जम्मू पोलिसांना शहरात दहशतवादी हल्ला होईल. शिवाय, गजबजलेल्या ठिकाणी एखाद्या अल्पवयीन मुलाच्या सहाय्याने हल्ला केला जाऊ शकतो, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. यामुळेच हल्ला झाल्यानंतर एका तासात आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले. आरोपीने युट्यूबच्या सहाय्याने ग्रेनेड हल्ला कसा करायचा याचे प्रशिक्षण घेतले होते. दरम्यान, जम्मूच्या बसस्थानकावर झालेला हा तिसरा हल्ला आहे. याआधी डिसेंबर 2018मध्ये स्फोट झाला होता. यात कोणतीही हानी झाली नव्हती. 24 मे 2018 रोजी झालेल्या स्फोटात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jammu bus stand blast accused was paid rs 50000 by hizbul